ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी साखर आयुक्तांना विचारणा

भाजपमध्ये ऊसतोड कामगारांचे नेतृत्व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एकहाती अनेक वर्षे केले होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

सरकारकडून मागण्यांकडे दुर्लक्ष – सुरेश धस

बीड :  ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाजप आमदार सुरेश धस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. या प्रश्नावर सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याबाबत त्यांनी विचारणा केली.

बीड  ऊसतोड  कामगारांचा जिल्हा असल्याने मागच्या वर्षी ऊसतोडणी मजुरीत दरवाढ मिळावी यासाठी संप पुकारण्यात आल्यानंतर भाजपने अधिकृतपणे आमदार सुरेश धस यांच्याकडे नेतृत्व दिले होते. धस यांनी राज्यभर वाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन ऊसतोड कामगारांच्या समस्या आक्रमकपणे मांडत दरवाढ मिळावी यासाठी ठोस भूमिका घेतली. मात्र सरकार, साखर संघ यांनी धस यांना वगळून बैठक घेत कामगारांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत कामगारांच्या प्रश्नासाठी कायम लढा सुरू ठेवला आहे. भाजपमध्ये ऊसतोड कामगारांचे नेतृत्व दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी एकहाती अनेक वर्षे केले होते. यावेळी भाजपने आमदार सुरेश धस यांच्याकडे सुत्रे दिल्यानंतर त्यांनी राज्यभर कामगारांची मोट बांधली. करोना टाळेबंदीत अडचण आलेल्या कामगारांसाठी रात्री, अपरात्रीही धावून गेले. परिणामी धस यांच्यावर अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा धस यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची बुधवारी भेट घेऊन ऊसतोड कामगारांचे प्रश्न मांडले. आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला तरीही महामंडळाची अंमलबजावणी झाली नाही. ऊसतोड कामगारांची नोंदणी व आकडेवारी संकलित करण्यात दिरंगाई केली जात आहे. आश्वासन देऊनही विधी मंडळाचे तीन अधिवेशने झाले तरी ऊसतोड कामगारांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही. ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी उपसभापती नीलम गो ऱ्हे यांच्या समितीने सुचवलेल्या उपाययोजनांचीही अंमलबजावणी आरोग्य प्रशासनाकडून होत नाही. त्यामुळे गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखानास्तरावर महिलांसाठी आयुर्मंगलम योजनेची नव्याने सुरुवात करावी आणि कामगारांना कोणत्या सेवा सुविधा मिळणार आहेत ते जाहीर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Asking sugar commissioner questions of sugarcane workers akp