अमरावती : अकरा महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस आयुक्त, उपायुक्तांना जबाबदार ठरवल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रामसिंह गुलाबसिंह चव्हाण (५४, रा. चपराशीपुरा) असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कोतवाली पोलीस ठाण्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना वेतन मिळाले नव्हते. त्याआधी अपघातामुळे ते सेवेत हजर होऊ न शकल्याने नऊ महिन्यांचे त्यांचे वेतन रोखून ठेवण्यात आले होते. तब्बल अकरा महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांना कर्जबाजारी व्हावे लागले. त्यांचा एक मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे पाठवता येत नाहीत, त्यामुळे ते मानसिकदृष्टय़ा खचले होते. याचा उल्लेख त्यांनी मृत्यूपुर्व चिठ्ठीत केला आहे.

सोमवारी त्यांची रात्रपाळी होती. पण, सेवेवर जाण्याआधी दुपारी कुणी घरी नसल्याचे पाहून त्यांनी पंख्याला दोर बांधून गळफास घेतला. चव्हाण यांच्या कुटुंबीयांना त्यांचा मृतदेहच आढळून आला.

सेवेत हजर असूनही आपल्याला दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कार्यालयातील लिपिकाकडे यासंदर्भात विचारणा केली, तेव्हा त्याने पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी वेतन काढण्यास मनाई केल्याचे त्याने सांगितले.

याआधी सेवेवर असताना अपघात झाल्याने मेडिकल बोर्डाने विश्रांती घेण्यास सांगितले होते. त्यावेळी तब्बल नऊ महिन्यांचे वेतन मिळाले नव्हते. यामुळे आपल्याला अनेकांकडून कर्ज घ्यावे लागले. मोठा मुलगा पुणे येथे शिक्षण घेत आहे. त्याला पाठवण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. यामुळे त्रस्त झालो असून आत्महत्या करीत असल्याचे चव्हाण यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

या चिठ्ठीत त्यांनी पत्नी अनिता, मुलगा अमन आणि सागर यांचा उल्लेख करून आपण पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांमुळेच आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

जोपर्यंत त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला जात नाही, तोपर्यंत आपल्यावर अंत्यसंस्कार केले जाऊ नयेत, असेही त्यांनी लिहून ठेवले आहे.

दरम्यान, चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहचून रोष व्यक्त केला. जोपर्यंत आत्महत्ये साठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.