नितीन गडकरी यांचे आश्वासन

राहाता : नगर मनमाड महामार्गाच्या कामास येत्या १५ दिवसात सुरुवात होऊ न हा महामार्ग सुशोभीकरणासह चांगल्या दर्जाचा होईल, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.

गडकरी यांनी गुरुवारी शिर्डी येथे येऊ न साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की शिर्डी शहरातून जाणाऱ्या नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गाच्या सुशोभीकरणासाठी ३० कोटी रुपयांचा अधिकचा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही गडकरी यांनी खासदार डॉ.सुजय विखे यांना दिली.

शिर्डीमध्ये देश विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. शहराच्या सुशोभीकरणासाठी नगरपंचायत प्रयत्न करीत असतेच परंतु केंद्र सरकारने अधिकचा निधी दिल्यास शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरेल, ही बाब खा.विखे यांनी मांडली. यावर नगर मनमाड या मार्गाच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार करून तातडीने पाठवा, तीस कोटी  रुपयांचा निधी मंजूर करतो अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. या प्रसंगी नगरपंचायतीच्या वतीने गडकरी यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे,नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे  यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सावळीविहीर ते कोपरगाव हा रस्ता अजून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरित झालेला नाही. तत्काळ रस्त्याची डागडुजी करून नगर मनमाड रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी राहात्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.