पंढरपूर पालखीमार्गाच्या कामाचे भुमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,  ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “नितीन गडकरी यांनी पुण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्र सरकारकडून काही अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या आहेत. पालखीमार्गाचा विकास करणे ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे. उन वारा पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पाऊलावर तुमच्यासोबत आहे हे वचन मी या निमित्ताने देऊ इच्छितो.”

वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठा करण्याचा निर्णय खूप महत्वाचा

“वारीचे दर्शन मी स्वत: घेतले. मी काही वर्षांपूर्वी वारी ची एरिअल फोटोग्राफी केली. यामाध्यमातून मी भक्तीसागर पाहिला. विठु माऊलीचे विराट दर्शन मी यात पाहिले. अनेक ठिकाणाहून पालख्या पंढरपूरला येतात. हे दृष्य पाहून अनेक नद्या सागराकडे धावत येत असं वाटतं. वाखरी हे या पालख्यांची एकत्र येण्याची जागा. त्यामुळे वाखरी ते पंढरपूर मार्ग मोठा करण्याचा निर्णय खुप महत्वाचा आणि मोठा आहे, तिथे सर्व पालख्या एकत्र येऊन भक्तीसागर निर्माण होतो. ऐहिक सुखाच्या मागे न लागता त्यापलिकडे जाऊन देहभान हरपून जाणारे वारकरी जेंव्हा या मार्गावरून चालत असतात तेंव्हा भक्तीसागराच्या  या पाण्याला विठुनामाचा नाद असतो”, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

महाराष्ट्र प्रत्येक पावलावर केंद्र शासनासोबत असेल

मुख्यमंत्री म्हणाले, “भक्तीमार्गावरून आजवर आपल्या देशाची वाटचाल झाली आहे. ही वाटचाल आणखी सहज व्हावी यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नितीन गडकरी यांना धन्यवाद. लाखो वारकऱ्यांचे चरणस्पर्श होणारे हे रस्ते आहेत. वारीला जाता आले नाही तरी वारी करून आलेल्या वारकऱ्यांच्या पाया पडून आपण दर्शन घेतो. ही आपली परंपरा आणि ही आपली संस्कृती आहे. वारीने समाजाला दिशा, संस्कृती आणि संस्कार दिले. या पालखी मार्गाच्या कामास विठु माऊलीचेही आर्शीवाद मिळतील. या कामासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर केंद्र शासनासोबत असेल हे मी वचन देऊ इच्छितो.”