सांगली : भाजप भांडणे लावणारा पक्ष आहे. कुणालाही मतदान करा, मात्र, आई शपथ सांगतो, कमळाला मतदान करू नका असे आवाहन माजी मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी जतमध्ये केले.

जतमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, माजी आमदार विकम सावंत, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजयनाना शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. जानकर म्हणाले, भाजप दोन समाजच नव्हे तर जाती जातीमध्ये भांडणे लावणारा पक्ष आहे. दोघांच्यात भांडणे लावून आपला स्वार्थ साधण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो.त्यांना गरज असेल तेव्हा ते अगदी विरोधकांनाही पायघड्या घालायला कमी करत नाहीत, मात्र, वेळ निघून जाताच पायाखाली घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांची काय अवस्था केली आहे हे आपण पाहतो. तशी माझीही अवस्था करण्याचा प्रयत्न होता, मात्र, मी वाचलो कारण मी काही भानगडीच केल्या नाहीत. यामुळे मतदारांनी जाती-जातीत भांडण लावणार्‍या भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी कमळ वगळून कुणालाही मतदान केले तर ते मत समाजस्वास्थ्यालाच ठरेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जतच्या लोकप्रतिनिधींचे हिंदूत्व हे केवळ मंत्रीपद व ठेकेदारी मिळवण्यासाठी असल्याची टीका खासदार विशाल पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली. अगोदर हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन यांच्याबाबत भाई-भाई म्हणणारे मुख्यमंत्र्यांना खूष करण्यासाठी हिंदूत्वनिष्ठ असल्याचा आव आणत आहेत. केवळ स्वार्थासाठी या नेत्यांने आपले गाव सोडून जत मतदार संघातून उमेदवारी घेतली. जत तालुक्याचा सर्वांगिण विकास व्हावा असा यामागे उद्देश नव्हता, तर केवळ मंत्री पद आणि ठेका मिळावा यासाठी येथून निवडणूक लढवली आणि या तालुक्याचे दुर्दैव त्यांचा विजय झाला. जत शहराचा जर विकास करायचा असेल आणि नागरी सुविधा जतकरांना मिळवायचा असतील तर काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याविना पर्याय नाही.

नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार डॉ. रविंद्र आरळी यांच्याबाबत बोलताना खासदार पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीत एकावर एक फ्री आमदार अशी घोषणा करून मते घेतली. मात्र, विधान परिषदेवर संधी तर दूरच राहिली आता नगराध्यक्षपदाची उमेदवारी गळ्यात मारण्यात आली आहे. फौजदाराचा हवालदार केला असल्याची टीका त्यांनी केली.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. आरळी यांच्यासह भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार पडळकर यांनी जतमध्ये ठाण मांडले असून प्रचार सुत्रे त्यांच्या हाती आहेत. प्रभाग निहाय प्रचार फेर्‍या आणि सायंकाळी कोपरा सभा असे नियोजन करण्यात आले आहे.

जत नगरपालिकेसाठी महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्यावतीने स्वतंत्र पॅनेल मैदानात उतरवले असून नगराध्यक्ष पदासाठी सुरेश शिंदे यांची उमेदवारी आहे. माजी आमदार विलासराव जगताप, माजी सभापती तमणगोंडा रविपाटील यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे, तर शिवसेनेनेही या ठिकाणी नगराध्यक्ष पदासह १७ सदस्यांसाठी उमेदवारी दाखल केली असून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी गुरूवारी मंत्री उदय सामंत यांची जाहीर सभा आयोजित केली आहे.