“राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा ; केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखर सह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध द्या.” अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“करोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणीतून राज्यातील जनता अद्याप बाहेर पडलेली नसतानाच अगोदर मुंबई, कोंकण व आता मराठवाडा, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे अतीव नुकसान झाले आहे, दोन वेळचे अन्न मिळण्यासाठी सुद्धा अनेक परिवारांची परवड होत आहे. करोनाच्या काळात एका रुपयाची सुद्धा मदत न करणाऱ्या ठाकरे सरकारने किमान आता तरी राज्यातील जनतेची दिवाळी गोड व्हावी याकरिता सर्व केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखर सह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध करून द्यावे.” अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

तसेच, “करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या देशभरातील सुमारे ८० कोटी नागरिकांना गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून, वर्षभर मोफत अन्नधान्य देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आले. देशभरातील लोकांची गरज लक्षात घेता केंद्र सरकारने पूर्वी एक वर्षासाठी असलेली ही योजना दिवाळी पर्यंत वाढवली आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी राज्यातील ७ कोटी नागरिकांना राज्य सरकारकडून एका महिन्याचे धान्य मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली खरी, परंतु केंद्र सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून झालेल्या धान्य पुरवठ्यामुळे राज्य सरकारने घोषणा करूनही मोफत धान्य वाटप केले नाही. करोनाच्या काळात एका रुपयाचे सुद्धा पॅकेज जाहीर न करणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यात झालेल्या अतिवृष्टी नंतरही बळीराजाला किंवा नुकसानग्रस्त नागरिकांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. किमान आतातरी आपल्या राज्याची तिजोरी मोकळी करून मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला मदत करावी. ” अशी मागणी सुद्धा आमदार भातखळकर यांनी यावेळी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: At least sweeten the diwali of the people of the state atul bhatkhalkar msr
First published on: 12-10-2021 at 14:28 IST