कर्जत : निधी उपलब्ध असूनही रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाने आज, सोमवारी कर्जत नगरपंचायत कार्यालयवर मोर्चा नेऊन उपोषण सुरू करण्यात आले आहे.या आंदोलनाचे नेतृत्व अंकुश भैलूमे, विशाल काकडे, दत्ता कदम, अनिल समुद्र, संतोष आखाडे, अजय भैलुमे, बापू डुकरे, हमजत शेख, सागर भैलुमे, बबन भैलुमे, भाऊ भैलुमे, गोदड समुद्र आदी करत आहेत. मोर्चात मोठ्या संख्येने लाभार्थी व आठवले गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. नगरपंचायत कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता.यासंदर्भात बोलताना आंदोलनकर्ते अंकुश भैलुमे यांनी सांगितले की, सन २०२२-२३ पासून रमाई आवास योजनेचे ३ कोटी ७५ लाख ४० हजार रुपये कर्जत नगरपंचायतच्या खात्यामध्ये जमा आहेत, मात्र या पैशाचा कोणताही लाभ २४८ लाभार्थी कुटुंबांना गेल्या तीन ते चार वर्षांपासून देण्यात आलेला नाही. तसेच कर्जत शहरातील अक्काबाई नगर, सिद्धार्थनगर, राजीव गांधी नगर, लहुजीनगर, अण्णाभाऊ साठे नगर, कुंभार गल्ली, यासीननगर आणि इतर ठिकाणी रहिवाशांच्या घरांच्या नोंदी सिटीसर्वेमध्ये करण्यात याव्यात, वारंवार मागणी करून ही नगरपंचायत याबाबत कोणताही पुढाकार घेत नाही.

नगरपंचायतीच्या सफाई कामगारांच्या कायमस्वरूपी नियुक्त्या करून तसे लेखी आदेश द्यावेत तसेच सफाई कामगारांच्या वारसांना विनाशर्त सेवेत सामावून घेणे कंत्राटी कर्मचारी यांचे वारसांना देखील विनाशर्थ कामावर सामावून घ्या. तसेच सर्व सफाई कर्मचाऱ्याना स्वच्छतेसाठी आवश्यक असणारी किट कयमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी, त्यांचे मानधन दरमहा वेळेवर व नियमितपणे द्यावे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या १७ गावांच्या कामांचे अंदाजपत्रकाप्रमाणे जीएसटीची रक्कम वगळून पूर्ण रकमेची कामे तात्काळ पूर्ण करावीत. अंतर्गत रस्ते व पथदिवे दुरुस्ती करून कायमस्वरूपी ते सुरू राहतील याचे नियोजन करावे आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

मोर्चेकऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयसमोर जोरदार घोषणाबाजी केली. नंतर आंदोलनकर्ते व मुख्याधिकारी यांची चर्चा झाली, मात्र तोडगा न निघाल्यामुळे उपोषण सुरू ठेवण्यात आले आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहील, असे अंकुश भैलुमे व विशाल काकडे यांनी सांगितले.