सांगली : शेजारच्या घरात पैसे चोरल्याची कबुली देत नाही यामुळे बापानेच पोटच्या दोन मुलींना तब्बल बारा तास पत्र्याच्या घरातील लोखंडी ॲंगलला उलटे टांगले. रात्रभर पाणी मागणाऱ्या मुलींपैकी एकीचा तडफडून मृत्यू झाला तर दुसरी मुलगी अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. नातींना सोडवण्यासाठी आलेल्या आजोबाला जीवे मारण्याची धमकी देत रोखले.

आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात घडलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर माणुसकीच्या अस्तित्वालाच हादरा देणारी आहे. नाना ऊर्फ दादु हैबती यमगरच्या शेजारच्या व्यक्तीने या मुलींनी घरात चोरी केल्याचा संशय घेतला.त्यामुळे संतापाच्या भरात बाप नाना यमगर यांने अनुजा (वय ११) व सानिका उर्फ  ॠतुजा (वय ९) या दोन्ही मुलींना हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटे टांगले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडला.

रात्रभर त्या चिमुकल्या वेदनेने विव्हळत ‘पाणी… पाणी’ अशी हाक देत होत्या. त्यांच्या आक्रोशाने घर दणाणून गेले, पण आई-वडिलांच्या हृदयाला मात्र पाझर फुटला नाही. उलट, त्या निष्पाप मुलींच्या खालीच आई-वडील निर्धास्त झोपले होते, तर बाहेर आजी-आजोबा झोपले होते.

रात्रभर चाललेल्या या अमानुष छळामुळे सानिकाने अखेर वेदनांना हार मानत प्राण सोडले. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास आजोबांनी मुलींना खाली उतरवले. मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते. सानिका मृतावस्थेत आढळली, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हा धक्कादायक प्रकार बाहेर येऊ नये म्हणून कुटुंबीयांनी सानिकाच्या मृतदेहावर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा अमानवी प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र, मृत्यूशी झुंज देणाऱ्या अनुजानेच या सगळ्या क्रौर्याचा पर्दाफाश केला. शुद्धीवर आल्यानंतर तिने डॉक्टरांना दिलेल्या जबाबात, वडिलांनी आम्हाला बांधून उलटे टांगले आणि मारहाण केली असे स्पष्ट सांगितले. या एका वाक्याने संपूर्ण घटनेचा भांडाफोड झाला. डॉक्टरांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.

दरम्यान, मुलींना खाली सोडणाऱ्या आजोबांवरही आरोपी बापाने कोयत्याने हल्ला करत धमकावल्याचे समोर आले आहे. या घटनेने बनपुरीसह संपूर्ण आटपाडी तालुका हादरला आहे. गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जोरदार मागणी होत आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलींच्या बापाला ताब्यात घेण्यात आले आहे.