अतिरेक्यांचे डाव उधळून लावणे किंवा घुसखोर दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी स्थापन झालेल्या दहशतवादविरोधी पथकाने खाणीतील खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जिलेटिनच्या कांडय़ा जप्त करण्यासाठी टाकलेली धाड सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. दापोली तालुक्यात आशापुरा माईनकेम कंपनीतर्फे बॉक्साईटच्या खाणींमध्ये नियमितपणे खोदकाम करून कच्चा खनिज माल बाहेर काढला जातो. त्यासाठी जिलेटिन व डिटोनेटर्सचा वापर करण्यात येतो. कायद्यानुसार दररोज मंजूर साठय़ाएवढीच या स्फोटकांची साठवणूक केली जाते. पण खाणीत खोदकामाचे काम नियमित चालू असल्याने अनेकदा त्यापेक्षा जास्त साठा असतो, हे उघड गुपित आहे. मात्र ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकाने अचानक गेल्या शुक्रवारी रात्री तेथे धाड टाकून नियमापेक्षा जास्त असलेला जिलेटिन व डिटोनेटर्सचा साठा जप्त केला, एवढेच नव्हे तर तेथे असलेल्या शेखर विलासराव देशमुख याला ताब्यात घेऊन ठाण्याला नेण्यात आले. या प्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी घेण्यातही या पथकाने तत्परता दाखवली आहे.
तांत्रिक व कायदेशीरदृष्ट्या अशा प्रकारे नियमबा’ा साठा करणे बेकायदेशीर असले तरी अशा स्वरूपाच्या खाणींची कार्यपध्दत पाहता अनेक ठिकाणी दैनंदिन गरजेपेक्षा जास्त साठा केलेला असतो. या पाश्र्वभूमीवर ठाण्याच्या दहशतवादविरोधी पथकाला याच कंपनीच्या खाणीवर छापा टाकण्याइतके ‘दहशतवादी कृत्य’ का वाटले, याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत.