|| मंगेश राऊत

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची आकडेवारी

कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने समाजात चिंतेचे वातावरण असून यवतमाळ जिल्ह्य़ातील घटनेने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. परंतु, हे आजच घडत आहे असे नाही. गेल्या काही वर्षांचा अभ्यास केल्यास पोलिसांवरील हल्ल्यांत दिवसेंदिवस वाढच होत असल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला मद्य तस्कराने चंद्रपूर जिल्ह्य़ातील नागभीड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्या अंगावर वाहन चढवले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता यवतमाळ जिल्ह्य़ातील मारेगाव पोलीस ठाण्याच्या एका हवालदारावर गुन्हेगार व त्याच्या आईने हल्ला करून ठार केले. सीआयडीच्या २०१६ च्या गुन्हे अहवालानुसार, २०१५ मध्ये एकूण ३७० पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करण्यात आले होते. तर, २०१६ मध्ये ४२८ पोलिसांवर हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये २०१६ मध्ये ५६ पोलिसांचा मृत्यू झाला. सर्वाधिक ११ पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्य़ात झाला आहे. चंद्रपूर जिल्हय़ात दारूबंदी होऊन चार वष्रे झाली आहेत. त्यानंतर तेथे पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. मद्यतस्करी व अवैध दारू विक्री हे त्यामागचे प्रमुख कारण असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे.

दुसरा क्रमांक हा भंडारा जिल्हय़ाचा लागतो. या जिल्हय़ात २०१६ मध्ये पाच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. गडचिरोली व जळगावमध्ये प्रत्येकी चार पोलिसांना प्राण गमवावे लागले, तर अहमदनगर, रायगड, ठाणे ग्रामीण, नवी मुंबईत प्रत्येकी तीन पोलिसांचा हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला. गुन्हेगारांच्या हल्ल्यांमध्ये मृत पावलेल्यांत ५६ पैकी ५५ हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यात २४ पोलीस शिपाई, १९ हवालदार आणि १३ साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर एक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे

दंगलीत सर्वाधिक हानी

एखाद्या ठिकाणी दंगल उसळल्यास सर्वाधिक हानी ही सार्वजनिक मालमत्तेची व पोलीस विभागाची होती. एकूण जखमींमध्ये दंगल नियंत्रणात आणताना जखमी होण्याचे प्रमाण ४४.८६ टक्के आहे.  ३४.५८ टक्के इतके प्रमाण पाठलाग करताना अपघात होणे तर गुन्हेगारांकडून हल्ल्यांमध्ये जखमी होण्याचे प्रमाण १४.९५ टक्के आहे. त्याशिवाय दरोडेखोरांकडून किंवा छापा घालताना झालेल्या हल्ल्यांत जखमी होण्याचे प्रमाण एक टक्का आहे.

मुंबईचा आलेखही चिंताजनक

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर या नऊ पोलीस आयुक्तालयांतर्गत १६३ पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हेगारांकडून हल्ले करण्यात आले आहे. त्यात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.  त्यापैकी सर्वाधिक ९१ हल्ले एकटय़ा मुंबई शहरात झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांबाबत राज्याचा विचार केल्यास मुंबईचा प्रथम क्रमांक लागत असून त्याखालोखाल बुलडाणा (४०), गडचिरोली (३५), पुणे शहर (२९) आणि अमरावती ग्रामीण (२७) चा क्रमांक लागतो. मात्र, हल्ल्यांमध्ये पोलिसांचा मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात आहे.

जखमींमध्ये शिपाई जास्त

कोणत्याही लढाईत सर्वात जास्त नुकसान होते ते शिपायांचेच. पोलीस दलही याला अपवाद झाली. हल्ल्यांमध्ये जखमी व मृतांमध्ये सर्वाधिक प्रमाण शिपायांचेच आहे. जखमींचा विचार केल्यास एकूण जखमींमध्ये २६५ शिपाई, ८७ हवालदार, १८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ४० उपनिरीक्षक आणि १२ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे, तर सहा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी आहेत.