“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा | Attack on Maharashtra Trucks in Karnataka Belgaon Sambhaji Chhatrapati Reacts scsg 91 | Loksatta

“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”; शिवरायांचा संदर्भ देत संभाजीराजे छत्रपतींचा ‘जशास तसे उत्तर’ देण्याचा इशारा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांनी उल्लेख केलाय

Sambhaji Chhatrapati
संभाजी छत्रपतींनी समाजमाध्यमांवरुन दिला इशारा (फोटो लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मागील काही दिवसांपासून कर्नाटक आणि महाराष्ट्रामधील सीमाप्रश्नाचा वाद पुन्हा चर्चेत आलेला असतानाच आज बेळगावजवळ महाराष्ट्रातील नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद पुण्याबरोबरच राज्यातील अन्य शहरांमध्येही उमटण्यास सुरुवात झाली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला हे हल्ले थांबवण्यासाठी २४ तासांचं अल्टीमेट दिलं आहे. या प्रकरणानंतर राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याशी फोनवरुन चर्चा करुन घडलेल्या घटनेबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आहे. अशातच आता थेट संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला. महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक करत तोडफोड करण्यात आली आहे. याच हल्ल्यानंतर ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’च्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्याजवळ धरणे आंदोलन करुन वाहतूक अडवण्याचाही प्रयत्न केला. स्थानिक पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. तरीही या ठिकाणी कार्यकर्त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने बराच वेळ पिवळ्या आणि लाल रंगाचे झेंडे फडकवत ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत होते. या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये महाराष्ट्रातील काही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यांसंदर्भात प्रतिक्रिया नोंदवताना संभाजी छत्रपती यांनी शिवारायांचा उल्लेख केला आहे. “छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,” असा इशारच संभाजी छत्रपतींनी दिला आहे. “रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल,” असंही संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: जाळपोळ, डॉक्टरांवर हल्ले ते महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक… ६० लाख सदस्य असलेल्या ‘कर्नाटक रक्षणा वेदिके’चा वादग्रस्त इतिहास

या ट्वीटमध्ये संभाजी छत्रपतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही टॅग केलं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटणार तरी कधी? हा वाद काय आहे?

दरम्यान, शरद पवार यांनीही बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीचं पत्र आपल्याला आलं असून या भागातील नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचा संदेश देण्यासाठी ४८ तासांमध्ये हे प्रकरण निवळलं नाही तर माझ्यासहित अनेक पदाधिकारी बेळगावला जातील असं मुंबईतील पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 17:27 IST
Next Story
“…नाहीतर मला बेळगावात जावं लागेल”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला ४८ तासांचा वेळ