नांदेड :  बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येत हल्लेखोरांकडून विदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर केला गेल्याचे घटनास्थळी सापडलेल्या काडतुसांवरून समोर आले. विदेशी बनावटीच्या पिस्तुलाचा वापर पहिल्यांदाच केला गेल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शहर पोलीस दलातील सर्वच पोलीस अधिकारी, कर्मचारी हल्लेखोरांच्या मागावर असून पोलिसांच्या दफ्तरी नोंद असलेल्या गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. 

नांदेडमध्ये चाकू, सुरी, तलवार आणि तत्सम हत्यारांचा धाक दाखवून लूटमारीच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत. प्रसंगी गोळीबार करून खंडणी मागणे, दहशत निर्माण करून लूटमार करणे असेही प्रकार घडले आहेत.  या गुन्ह्यांचा छडा लावतांना पोलिसांनी गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक पिस्तुले, गावठी कट्टे जप्त केले. काही गुन्हेगारांना अटक करून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमूळे नांदेडमध्ये अशा घटना घडणार नाहीत, असे वाटत असतानाच बांधकाम व्यावसायिक बियाणी यांची गोळय़ा घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख संजय निलपत्रेवार आणि त्यांच्या चमूने गुरुवारी गस्ती दरम्यान दोन गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, एक पिस्तूल जप्त केले. कृष्णा गजभारे, प्रेमसिंघ रामगडीया अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गुन्हेगारांकडे गावठी कट्टे आणि पिस्तुले बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातून येतात, असे पोलिसांकडून सांगण्यात येते. या शस्त्रांचे तस्कर परराज्यातील असले तरी या तस्करीला आश्रय देणारे दलाल स्थानिकच आहेत. त्यामूळे तस्करीचे एखादे प्रकरण उघडकीस आले की स्थानिक दलाल किंवा शस्त्रांचा खरेदीदार पोलिसांच्या गळाला लागतो. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शस्त्र पुरविणाऱ्या एखाद्याचे नाव समोर येईल असे पोलिसांचे  म्हणणे आहे.