नगर : महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या व आंदोलनाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आज, बुधवारी महसूल कर्मचाऱ्यांनी मुंडन करून घेत ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी घोषणाबाजीही करण्यात आली.
विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १० दिवसांपासून (दि. ४ एप्रिल) महसूल कर्मचारी संपावर आहेत. मात्र, राज्य सरकारने आंदोलनाचा दखल घेतली नाही. आंदोलन सुरू झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महसूल कर्मचारी मोठय़ा संख्येने जमत निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधून घेत आहेत.
आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी राजू गायकवाड यांनी मुंडन करून घेत प्रातिनिधिक स्वरूपात शासनाचा निषेध नोंदवला. या वेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डमाळे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जिल्हाध्यक्ष डमाळे, भाऊ आढाव, सुभाष तळेकर यांची भाषणे झाली. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.