अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी खासदार अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतली आहे. आज शरद पवार जुन्नर, आंबेगाव, खेडच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी अमोल कोल्हेंच्या निवासस्थानी असताना जुन्नरचे आमदार अतुल बेनके शरद पवार यांना भेटले आहेत. या भेटीबाबत विचारले असता, लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केले ते आमचे आहेत, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यामुळे, अतुल बेनकेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाचे काम केले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके आता शरद पवार गटामध्ये घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, ते म्हणाले की, "भेट घेतली म्हणून काय झालं? अनेक आमदार माझी पण भेट घेतात. याबाबत तुम्ही बेनके यांनाच अधिक विचारायला हवे." तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांनी म्हटले की, "ते हल्ली कुठल्या पक्षात आहेत? ते कोणत्या पक्षात आहेत, ते मला माहिती नाही. लोक भेटायला येतात. त्यांचे वडिल माझे मित्र आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यांनी काम केले ते आमचे आहेत." हेही वाचा : दोन मतदारसंघात एकसारखेच तीन हजार मतदान कार्ड; मोठं षडयंत्र असल्याचा बावनकुळेंचा आरोप अतुल बेनके काय म्हणाले? या भेटीसंदर्भात अतुल बेनके म्हणाले की, "पवार साहेब, अजित पवार, सुप्रिया ताई, दिलीप वळसे पाटील अशा सर्वांचा माझ्यावर आशीर्वाद राहिला आहे. या सगळ्या नेत्यांना पाहतच मी मोठा झालो आहे आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी जुन्नर तालुक्यातून निवडून आलो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काही स्थित्यंतरे झाली; तेव्हा मी सहा महिने तटस्थ भूमिकेत होतो. शरद पवार साहेबांबरोबर जायचे की अजित पवार यांच्याबरोबर जायचे, याबाबतचा गोंधळ माझ्या मनात होता. जुन्नर तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी असल्याने लोक अनेक विकास कामांसाठी माझ्याकडे अपेक्षेने येतात. ही विकासकामे पूर्णत्वास जावीत, यासाठी मी अजित पवार यांच्याकडे राहण्याचा निर्णय घेतला. त्यातून जुन्नर तालुक्याला न्याय देऊ शकलो, याबाबत माझ्या मनात समाधान आहे." शरद पवार गटात प्रवेश करणार का? अतुल बेनके शरद पवारांचे दार ठोठावत आहेत का, या प्रश्नावर ते म्हणाले की, "दार ठोठावायचा विषय नाही. मी त्या दृष्टीकोनातून अद्याप विचार केलेला नाही. किंवा अतुल तू इकडे ये, असेही पवार साहेब मला कधी म्हणालेले नाहीत. राजकारण राजकारणाच्या पातळीवर चालत राहिल. आमदार झाल्यापासून मी अनेक स्थित्यंतरे पाहिलेली आहेत आणि येणाऱ्या काळात काय घडेल, याची मला कल्पना नाही. मात्र, त्यामध्ये न पडता जुन्नरच्या हितासाठी जे काम करता येईल, ते मी करत राहीन." आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचे उमेदवार असाल की तुतारीचे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ आहे. या निवडणुकीला सामोरे जात असताना काहीही होऊ शकतं. त्यावर आता लगेच भाष्य करण्यात काहीही अर्थ नाही. महायुतीच्या जागावाटपामध्ये काहीही घडू शकतं. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेबही एकत्र येऊ शकतात. २८८ मतदारसंघांमधील मी एक छोटा घटक असल्याने पुढे काय होणारे, याबाबत मी कसे काय सांगू शकेन?" हेही वाचा : भय इथले संपत नाही….इरशाळवाडीच्या दरड दुर्घटनेची वर्षपूर्ती, वर्षभरानंतरही कायमस्वरूपी पुनर्वसन नाही शरद पवार काय म्हणाले, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, "पाऊस अद्याप झालेला नाही. मध्यंतरी पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. मात्र, अजूनही पुरेसा पाऊस न पडल्याने धरणे भरलेली नाहीत, अशा चर्चा आमच्यामध्ये झाल्या. अमोल कोल्हेंनी नव्याने बांधलेल्या गोठ्याविषयी चर्चा झाली. याव्यतिरिक्त राजकीय चर्चा काहीही झालेली नाही. मी अमोल कोल्हेंचा मित्र होतो आणि राहीन. यातून कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही."