मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (३१ जुलै) एका कार्यक्रमात बोलताना अचानक आलेल्या मुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीबद्दलचा किस्सा सांगितला आणि त्याचबरोबर ओढवलेल्या करोना संकटाबद्दलही ते बोलले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत आमदार भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

सेवानिवृत्त विभागीय आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या पुस्तकाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी झालं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या सुरूवातीच्या काळातच आलेल्या कोविडबद्दल भाष्य केलं. करोना संकट ओढवल्यानंतर झालेल्या गोंधळाबद्दलही मुख्यमंत्री बोलले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाष्यावरून अतुल भातकळकर यांनी टीका केली.

संबंधित वृत्त- …त्यावेळी काय करावं आणि काय करू नये; काहीही कळत नव्हतं -उद्धव ठाकरे

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “काय करावं आणि काय करू नये हे घरात बसून कसे कळेल? त्यासाठी घराची कडी काढावी लागते, मंत्रालयात जावं लागतं, अधिकाऱ्यांशी चर्चा करावी लागते, फायली चाळाव्या लागतात, रात्री अपरात्री फोन घ्यावे लागतात… थोडक्यात काम करावं लागतं”, असं म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “मला कोणताही व्यवस्थापनाचा अनुभव नाही. राज्यकारभाराचा अनुभव नाही, पण माझ्यावर अचानक मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. मुख्यमंत्री म्हणून का सुरू करतो ना करतो, तोच हे करोनाचं संकट पुढे येऊन ठाकलं. ज्याला आत्तापर्यंत फक्त टीव्हीत, बातम्यांमध्ये पाहिल होतं, आता तोच विषाणूजन्य आजार आपल्या राज्यात येऊन पोहोचला. तेव्हा मला काही कळत नव्हतं… काय करावं, काय निर्णय घ्यावा, काय सुरु करावं, काय बंद करावं. आजही फार काही कळतं असं नाही. पण त्यावेळी केंद्राच्या सूचनांनुसार काम सुरु झालं आणि लॉकडाउनचा पर्याय समोर आला”, असं ठाकरे म्हणाले होते.