राज्यात सुरु असणाऱ्या अभूतपूर्व सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळेस उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना भावनिक आवाहान केलं. मात्र याच भाषणादरम्यान भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी शेलक्या शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंना टोला लागवला आहे.

सायंकाळी पाच वाजता मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधणार होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाइव्ह साडेपाच वाजता सुरु झालं. फेसबुक लाइव्हच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी, माझी कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आली आहे, असं सांगितलं. पुढे बोलताना, बोलण्यासारखं बरंच काही आहे. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही. अश्या परिस्थितीत मला जे करायचे ते प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न प्रमाणिकपणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून उल्लेख झाला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेट राजकीय घडामोडींना हात घालत, “माध्यमात अनेक अफवा आहेत. मी भेटत नव्हतो असं सांगितलं जातयं. काही दिवस मला भेटणं शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया झाली होती. आता मी लोकांना भेटण्यास सुरुवात केली आहे. पहिली कॅबिनेट मी रूग्णालयामधून बाजूच्या खोलीमधून घेतली होती.. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य, एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी अयोध्येला गेले होते. विधानसभेमध्ये हिंदुत्वावर बोलणारा मी पहिलाच मुख्यमंत्री असेन,” असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

“ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविण्यात आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार निवडून आले. शिवसेनेचे आमदार निवडून आले ते पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेमुळे हे लक्षात ठेवा,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना लागवला.

“आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणुक झाली. हाॅटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा विचार आला की, ही कुठली लोकशाही? शंका ठीक पण लघुशंकेला गेला तरी शंका?,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शाब्दिक कोटी केली. “मी इच्छेपेक्षा जिद्दीने काम पूर्ण करणारा. कुठलाही अनुभव नसताना काम केलं. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः शरद पवारांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली. यामागे नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत मला झाली,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

“धक्का… हो धक्का! सकाळीच मला काँग्रेसच्या कमलनाथ यांचा आणि राष्ट्रवादीच्या शरद पवारांचा फोन आला. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे मला माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की, मी मुख्यमंत्री नको तर मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे सारं समोर येऊन बोला,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळेस बोलताना मुख्यमंत्र्यांनी, कुऱ्हाडीची गोष्टीचं रुपक म्हणून उदाहरण दिलं. “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ ही म्हण आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्यामागची गोष्ट कोणाला माहिती नाही. ती गोष्ट अशी आहे की, एकदा एका जंगलात लाकूडतोड्या झाड तोडत होता. कुऱ्हाडीचे घाव घालत असताना तिथे राहणारे पक्षी कासावीस झाले. पण घाव घातले जात असताना झाडाला किती वेदना होत असतील. म्हणून ते पक्षी झाडासोबत बोलू लागले. पक्ष्यांनी दादा खूप दुखत असेल ना? वेदना होत असतील ना? असं विचारलं. त्यावर झाडाने मला वेदना आणि दु:ख घाव होत आहेत याचं नाही तर हा लाकूडतोड्या ज्या कुऱ्हाडीने घाव घालत आहे त्याचं लाकूड माझ्या फांदीचं आहे याच्या वेदना जास्त होत आहेत. हेच आज चाललं आहे,” अशी व्यथा उद्धव ठाकरेंनी मांडली.

याच भाषणावर प्रतिक्रिया देताना अतुल भातखळकर यांनी, “पांचट कोट्यांचा शिल्लक कोटा पूर्ण करतायत बहुधा…” असं ट्विट केलंय. उद्धव ठाकरेंचं भाषण सुरु असतानाच त्यांनी हे ट्विट केलं. त्याचप्रमाणे फेसबुक लाइव्ह संपल्यानंतर भातखळकरांनी, “अडीच वर्षाचा प्रवास… फेसबुक लाईव्ह ते फेसबुक लाईव्ह!” असं म्हणत टोला लगावला आहे.

दरम्यान, आपल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी आपण राजीनामा द्यायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे. शिवसैनिकांनी त्यांचं प्रेम असेच ठेवावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.