भाजपा आमदार अतुल भातखळकर नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर टीका करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुढेही महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा दावा केला आहे. त्यांच्या याच दाव्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्यांना टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात, “महाविकास आघाडी पाच वर्षे टिकेल आणि नंतरही सत्तेत येईल- इति शरद पवार. महाविकास आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा पंढरपूरला दाखवून दिलेच आहे. आता परत देगलूर बिलोलीलाही दिसेल. बाकी दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कोणालाही बंदी नाही”.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी कंबर कसली आहे. पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार हल्ला चढवला. “ते म्हणत होते की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पण ते आतापर्यंत आलेच नाहीत. भाजपाचे नेते सांगतात महाविकास आघाडीचे सरकार आज पडेल, उद्या पडेल. पण दोन वर्षे झाली, सरकार खंबीरपणे उभं आहे. उद्धव ठाकरेंचे सरकार आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. जर महाविकास आघाडी अशीच अबाधित राहिली तर पुढेही उद्धव ठाकरेंचे सरकार सत्तेत येईल. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना नेतृत्व कोणाकडे द्यायचे याचा निर्णय घेण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते आणि आमदारांची बैठक झाली. त्यावेळी आमच्याकडे दोन तीन जणांची नवे पुढे आली. परंतु मी कुठलाही वेळ न लावता उद्धव ठाकरेंचा हात धरुन वर केला आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर केले. मात्र उद्धव ठाकरे तयार नव्हते. मात्र माझ्या एका शब्दावर त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे मान्य केलं”, असा दावा शरद पवार यांनी केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atul bhatkhalkars criticism after sharad pawars claim about mahavikas aghadi government vsk
First published on: 18-10-2021 at 13:21 IST