Atul Kulkarni Missing Link Tunnel Post : प्रसिद्ध अभिनेते आणि सामाजिक-राजकीय भाष्यकार अतुल कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर केलेली एक नवी पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचाराची व्याख्या स्पष्ट करत व्हीआयपी संस्कृती आणि राजकारण्यांच्या वर्तनावर बोट ठेवत थेट शब्दांत शाब्दिक हल्ला चढवला आहे.
भ्रष्टाचाराची नवी व्याख्या
अतुल कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टची सुरुवात “भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार” अशी केली आहे. भ्रष्टाचार म्हणजे केवळ ‘पैसे खाणे’ नसून, भ्रष्ट बोलणे आणि भ्रष्ट वागणे हा देखील भ्रष्टाचाराचाच एक भाग आहे, असं मत त्यांनी मांडलं आहे. ते म्हणाले, “भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. म्हणजे फक्तं पैसे खाणं म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे. नाही का? भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं म्हणजे देखील भ्रष्टाचारच. हो नं?”
राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पुणे मिसिंग लिंकचाही त्यांनी या पोस्टमध्ये उल्लेख केला. या लिंकवरील त्यांच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल ते म्हणाले, “काल मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे सामान्य नागरिक नियमानुसार ८० ची वेगमर्यादा पाळून जात असता कुणा सत्ताधारी व्यक्तीच्या गाड्या (नेमकं कोण ते कळालं नाही पण ते कुणीही असलं तरी फारसं वेगळं असलं असतं असं वाटत नाही), आम्हाला सायरनच्या धमक्या देत; ११०, १२० च्या वेगानं निघून गेल्या.” यावरून त्यांनी लोकप्रतिनिधींच्या नियमबाह्य वागणुकीवर तीव्र आक्षेप घेतला आहे.
राजकारण्यांच्या भाषेवर टीका
सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करताना ते म्हणाले की, “हे होत असता, मी नेमकं आपले वेगवेगळे राजकारणी गेल्या काही दिवसात काय, काय भाषेत बोललेत किंवा एरवीही किती खालच्या दर्जाची भाषा वापरतात ह्या संदर्भात काही वाचत होतो.” पोस्टच्या शेवटी त्यांनी खोचक टोला लगावत लिहिलं आहे की, “माझ्या ह्या वक्तव्यामुळे जर कुणा राजकारण्यांच्या भावना दुखावल्या असतील ‘तर'(च) मला क्षमा करा.”
दरम्यान, अतुल कुलकर्णी इतर अनेक सामाजिक-राजकीय विषयांवर सतत भाष्य करत असतात. सरन्यायाधीशांनी तरुणांना कॉकरोच म्हटले होते, याविरोधातही त्यांनी पोस्ट केली होती. “झुरळांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे खरं आहे?
बऱ्याच वर्षांच्या राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणांच्या अपयशामध्ये विनाकारण त्यांना खेचल्या बद्दल?”, अशी खोचक पोस्ट त्यांनी केली होती.
