मोठय़ा आवेशात किंवा अभिनिवेशाने बोलणे म्हणजे चांगले वक्तृत्व नव्हे, तर श्रोत्यांशी साधलेला विचारांचा संवाद म्हणजे चांगले वक्तृत्व असते, असे सांगत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी अशा वक्तृत्वाचा नमुनाच शुक्रवारी येथे पेश केला.
‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील रत्नागिरी विभागाची अंतिम फेरी शुक्रवारी येथे पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून पेठे बोलत होते.
जनता सहकारी बँक, पुणे आणि ‘तन्वी हर्बल’ प्रायोजित या स्पध्रेतील रत्नागिरी विभागाची प्राथमिक फेरी गेल्या २४ जानेवारी रोजी पार पडली. त्यामध्ये सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह गोव्यातील २९ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यातून ११ जणांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. येथील रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या सभागृहात शुक्रवारी ही अंतिम फेरी झाली. स्पध्रेनंतर थोडय़ाच वेळात त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.
मराठी रंगभूमीवरील प्रयोगशील दिग्दर्शक-अभिनेते अतुल पेठे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर आणि आकाशवाणीवरील ज्येष्ठ निवेदिका निशा काळे यांनी स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. जनता बँकेच्या रत्नागिरी शाखेचे व्यवस्थापक सुहास पाटणकर हेही या प्रसंगी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात बोलणाऱ्यांची संख्या कमी नाही, पण चांगले बोलणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असे मार्मिक निरीक्षण सुरुवातीलाच नोंदवून पेठे म्हणाले की, केवळ बोलणेच नव्हे, तर नाटक, काव्य, चित्र, शिल्प हीसुद्धा विचार मांडण्याची माध्यमे आहेत. तसा विचार चांगल्या वक्त्याकडे असायला हवा. केवळ लोकांच्या भावनांशी खेळते ते वक्तृत्व चांगले नाही. त्यापेक्षा गांधीजींचे संथ लयीतील पण विचारसन्मुख करणारे शब्द किती तरी जास्त मोलाचे ठरले आहेत. त्या दृष्टीने आधी स्वसंवाद, नंतर परस्परसंवाद आणि त्यातून लोकसंवादाचे कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.
काहीशा अवघड विषयांवर स्पर्धकांनी चांगली भाषणे केल्याचे नमूद करून स्पध्रेच्या परीक्षक निशा काळे यांनी स्वच्छ वाणीचे महत्त्व अधोरेखित केले, तर दुसरे परीक्षक कोनकर यांनी, चांगले वक्तृत्व म्हणजे पाठांतर नव्हे, असे सांगून स्पध्रेच्या भाषणात वेळेच्या नियोजनाचे महत्त्व लक्षात आणून दिले.
स्पध्रेतील विजेता हृषीकेश डाळे याला मुंबईत १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महाअंतिम फेरीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सिंहगड इन्स्टिटय़ूट, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस, इंडियन ऑइल, इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट (आयसीडी) यांचे स्पध्रेसाठी सहकार्य लाभले आहे. तसेच युनिक अ‍ॅकॅडमी आणि स्टडी सर्कल या स्पध्रेचे नॉलेज पार्टनर आहेत.