सांगली : पश्चिम घाटात सुरू असलेल्या संततधार पावसाने कृष्णा नदीची पाणी पातळी वेगाने वाढत असून गुरूवारी औदुंबरच्या श्री दत्त मंदिरात पाणी शिरले. तर सांगली शहरातील नदीकाठच्या उपनगरात पूराचे पाणी शिरण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे. यामुळे नदीकाठी सतर्क राहण्याचा इशाराही आज पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.
कृष्णा, कोयना, वारणा नद्यांच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाउस होत असून यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सांगली शहरातील आयर्विन पूलाजवळ बुधवारी २३ फूट ९ इंच असलेली पाणी पातळी गुरूवारी सकाळी २८ फूट ५ इंचावर पोहचली, तर दुपारी तीन वाजता २९ फूट ११ इंच झाली होती. शुक्रवारअखेर पाणी पातळी ३० ते ३२ फूटावर जाण्याची शक्यता पूर नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. इशारा पातळी ४० तर धोका पातळी ४५ फूट असली तरी नदीकाठी असलेल्या सुर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट व काकानगर या भागात पूराचे पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन सतर्क झाले असून या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत आणखी वृध्दी होण्याची शययता लक्षात घेउन नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे, अफवावर विश्वास न ठेवता प्रशासकीय पातळीवरून दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी केले आहे.
कृष्णा नदीवरील नागठाणे, बहे, डिग्रज, सांगलीवाडी, म्हैसाळ, राजापूर हे बंधारे पाण्याखाली गेले असून पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर ते नागठाणे या मार्गावरील पूलाला पूराचे पाणी लागले असून श्री क्षेत्र औदुंबर येथील दत्त मंदिरात गुरूवारी पहाटेच्या सुमारास कृष्णा नदीचे पाणी शिरले. दत्त मंदिराच्या गाभार्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले असून मंदिरातील उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलविण्यात आली. पुजार्यांनी दोन ते तीन फूट पाण्यातून दत्तनामाचा गजर करत श्रींच्या मूर्तीसह मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली. आता पूर ओसरेपर्यंत पूजा अर्चना देवघरात होणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वारणा नदीच्या चांदोली धरण परिसरासह पाणलोट क्षेत्रात अद्याप संततधार पाउस पडत असल्याने नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. वारणेवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले असून ऐतवडे खुर्द पूलावर पाणी आल्याने हा कोल्हापूरचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काखे-मांगले हा मार्गही बंद करण्यात आला असून यामुळे शिराळा ते शाहूवाडी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
