जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका ज्येष्ठ व्यक्तीच्या कार्यालयात जाऊन, दोन अज्ञातांनी बेदम मारहाण करीत, १३ तोळे वजनाच्या गळ्यातील तीन सोन्याच्या चेन लुटून नेल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) दुपारी शहरातील वरद गणेश मंदिराच्या मागे घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया क्रांती चौक पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विशाल इंगळे यांनी दिली.
अशोक पाटील (वय-६६, रा. नंदनवन कॉलनी) यांना मारहाण करून लुटण्यात आले. पाटील यांचे बसस्थानक समोरील भागात जमीन खरेदी-विक्रीचे व्यावसायिक कार्यालय आहे. याच ठिकाणी ते सर्व व्यवहार करतात. बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पाटील कार्यालयात एकटे असताना अंदाजे २५ वर्षे वयोगटातील दोन तरूण त्यांच्या कार्यालयात आले व काही समजण्याच्या आतच पाटील यांना मारहाण करीत गळ्यातील तीन सोन्याच्या साखळ्या लुटून पसार झाले. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.