औरंगाबाद : लाकडी खेळणींच्या नावाखाली कुरियरमधून मागवल्या तलवारी अन् गुप्त्या!

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; अमृतसरवरून मागवण्यात आलेलं पार्सल पोलिसांनी सापळा रचून पकडलं

auranagabad crime
अरमान इंटरप्राईजेस या कंपनीविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्ये कुरियरने मागविलेल्या ४१ तलवारी, सहा कुकरी, दोन गुप्‍त्‍यांसह एक माल वाहतूक करणारी गाडी असा सुमारे २ लाख ४५ हजार २५० रुपयांचा ऐवज पुंडलिकनगर आणि जिन्‍सी पोलिसांनी संयुक्तरित्‍या कारवाई करत जप्‍त केला. तसेच ही हत्‍यारं मागविणाऱ्या इरफान खान ऊर्फ दानिश अय्युब खान (२०, रा. जुना बायजीपुरा) याला रविवारी ४ पहाटे बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी इरफान ऊर्फ दानिश खान याला न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, ९ जुलैपर्यंत त्‍याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी व्‍ही.एच. खेडकर यांनी दिले.

बायजीपुरा येथील इंदिरानगरच्या इरफान ऊर्फ दानिश खानच्या नावावर हिना किराणा स्टोअर्स या पत्त्यावर कुरियरने अमृतसर येथील अरमान इंटरप्राईजेसकडून लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी येत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. या आधारे शनिवारी दि.३ दुपारी दोन वाजेच्या सुमारास सेव्हन हिल उड्डाण पुलाखाली पथकाने सापळा रचून कुरियरच्या सामानाची वाहूतक करणारी गाडी (क्र. एमएच-२० ईजी-११०७) ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यात दानिश खान नावाचे पार्सल आढळून आले. हे पार्सल अमृतसर येथून मागवण्यात आले होते. त्या पार्सलवर लाकडी खेळणी असा उल्लेख होता. पार्सल फोडून पाहिले असता त्यात ५ तलवारी आढळून आल्या. त्यानंतर दुपारपासूनच पुंडलिकनगर पोलिसांनी दानिशचा शोध घेऊन रात्री त्याला ताब्यात घेतले. चौकशीत इरफान खान याने दानिश या नावाने पार्सल मा‍गविल्याचे समोर आले. दरम्यान हे पार्सल जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जात असल्याने हा गुन्हा जिन्सी पोलिसांकडे वर्ग केला. त्यानंतर जिन्सी पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ईरफान ऊर्फ दानिशकडून वरील प्रमाणे हत्‍यारे जप्‍त केली.

दरम्यान, अरमान इंटरप्राईजेस या कंपनीने लाकडी खेळण्याच्या नावाखाली तलवारी पाठवून शासनाची फसवणूक केल्याने कंपनी विरोधात देखील गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

आरोपीला ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी –

आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी, आरोपीने यापूर्वी ऑनलाईन मागविलेल्या तलवारी शहराच्‍या विविध ठिकाणी विक्री केल्या असून त्‍या जप्‍त करणे आहेत. तसेच, आरोपी अशा प्रकारे ऑनलाई खरेदी कुठून करतो व गुन्‍ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Aurangabad swords ordered by courier under the name of wooden toys msr

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या