औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड-सोयगाव भागातील जरांडी शिवारात मागील आठवड्यात आढळून आलेल्या दोन मृत बिबट्यांवर विषप्रयोग केल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, या प्रकरणी काल सोयगाव न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सकपाळ यांनी दिली.
जरांडी शिवारात २३ व २४ फेब्रुवारी रोजी एक नर व एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आले होते. दोन्ही मृत बिबटे हे चार ते पाच वर्षांचे होते. सलग दोन दिवस बिबटे मृतावस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. प्रथमदर्शनी या मृत बिबट्यांवर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याअनुषंगाने वनविभागाचे उपवनसंरक्षक मंकावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि या प्रकरणी ज्ञानेश्वर परदेशी याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
याचबरोबर, ज्ञानेश्वर याने कोणाला सोबत घेऊन बिबट्यांवर विषप्रयोग केला, त्यामागे काय कारण आहे, आदीबाबींचा तपास सुरू असल्याचे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.