मुंबईमध्ये १ मे पासून सर्व टॅक्सी व रिक्षा चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. याविषयीचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. तर दुसरीकडं या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. मात्र मुंबईमध्ये अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची भूमिका भारतीय जनता पक्षातर्फे घेण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा स्तरावर कार्यालयामध्ये किंवा इतर खाजगी आस्थापनांमध्ये अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकवलं जाणार असल्याची माहिती, मुंबई भाजपा टॅक्सी रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष के.के.तिवारी यांनी दिली. यानंतर मुंबईतल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. ज्यांना मनसेने धडा शिकवण्याचा इशारा देत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे?

“मुंबई बंद पाडू अशा धमक्या महाराष्ट्राला दिल्या जात आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालवणार नाही आणि मग मुंबई बंद होईल हे सांगितलं जातं आहे. धमकी देणारे हे जे भय्ये आहेत, त्यांना मराठी माणसाने धडा शिकवण्याची ही योग्य वेळ आहे. यांना दाखवून द्यावं लागेल की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. इथे राहणारा मराठी माणूस म्हणजेच मुंबई आणि म्हणजेच महाराष्ट्र. महाराष्ट्र आणि मुंबई यांना कुणीही बाहेरचा भय्या वेठीस धरु शकत नाही.”

मराठीत बोललं पाहिजे हा कायदा २०१२ पासून आहे

मराठीत बोललं पाहिजे हा कायदा २०१२ पासून आहे. इतके दिवस हे सगळे हे भय्ये झोपले होते का? शिवाय या लोकांना मराठी येत नसताना त्यांना परमिट आणि परवाने कुणी दिले? त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे. मुदतवाढ वगैरे नंतर बघता येईल. ज्यांनी लायसन्स दिले त्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? स्थानिक भाषा आलीच पाहिजे हा कायदा आपल्याकडे आहे तरीही हे मराठी का शिकले नाहीत? असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे-संदीप देशपांडे

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. महाराष्ट्रात राहता, मुंबईत राहता मग इथली भाषा का शिकायची नाही? जर इथे पोट भरायचं असेल तर उत्तर प्रदेशात मराठी भाषा सक्तीची करा. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांना केंद्राकडून झुंजवलं जातं आहे. मात्र या राज्यांनी एकत्र येऊन उत्तरेलं आक्रमण रोखावं लागेल. अन्यथा स्थानिक भाषा मरतील, स्थानिक भाषांसाठीचा हा धोका आहे असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. शिवाय मी पुन्हा सांगतो की जो काही संप करायचा आहे करुन दाखवा, कशी मुंबई बंद करता आम्ही ते बघतोच. महाराष्ट्रातून आणि मुंबईतून या लोकांना आता परत पाठवायची वेळ आली आहे. त्यामुळे कशी मुंबई वेठीला धरली जाते जरा आम्हाला दाखवाच. आम्ही त्यांना धडा शिकवू हे त्यांनी मुळीच विसरु नये असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

Auto Taxi News
अमराठी रिक्षा चालकांचा संपावर जाण्याचा इशारा (फोटो-संग्रहीत )

काय म्हटलं आहे सरकारने?

१) सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे.

२) मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे.

३) ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान आहे की नाही ही बाब स्पष्ट करणे बंधनकारक आहे. यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांबरोबर मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे.

४) मसुद्यावर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे.

“मुंबईत ज्या ठिकाणी १००-२०० रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक बसू शकतात अशा कार्यालयांमध्ये आम्ही मराठी शिकवणार आहोत. मराठी शिकवण्यासाठी आम्ही विशेष मराठी प्राध्यापकांची नेमणूक करणार आहोत. फक्त सांताक्रुझ नाही तर मुंबईतील प्रत्येका विधानसभा मतदारसंघात हा उपक्रम आम्ही राबवणार आहोत. एकूण ३६ विधानसभा क्षेत्रामध्ये मराठी भाषा शिकवली जाणार आहे.”

के.के.तिवारी, अध्यक्ष, टॅक्सी रिक्षा असोसिएशन

marathi-mandatory-for-auto-taxi-drivers-pratap-sarnaik-decision-sanjay-nirupam-opposes
रिक्षा-टॅक्सी चालकांना १ मे पासून मराठी सक्तीची (संग्रहित छायाचित्र)

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांचं म्हणणं नेमकं काय?

अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. २८ एप्रिलपर्यंत योग्य तो निर्णय घ्या अन्यथा आम्ही ४ मे पासून संपावर जाऊ. हा राज्यव्यापी संप असेल आणि महाराष्ट्र आणि मुंबई बंद पाडू असा इशारा या संघटनांनी दिला आहे. या इशाऱ्याला मनसेने उत्तर दिलं आहे.

प्रताप सरनाईक यांनी काय म्हटलं आहे?

राज्यात १ मे पासून सर्व टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्ती केली आहे. या निर्णयाचं काही प्रमाणावर स्वागत तर काही प्रमाणावर विरोध होत आहे. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्रातील ओला-उबेर आणि रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलणं बंधनकारक करण्याचा निर्णय हा नवा नसून जुना निर्णयच आहे. आपण केवळ परिवहन मंत्री म्हणून त्याची अंमलबजावणी करत आहोत, त्यात चुकीचं काय? असा प्रश्न परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थित केला. यासह त्यांनी नियमभंगावर कठोर कारवाईचा इशाराही दिला.

मराठी शिकणार नाही असं म्हटलं तर खपवून घेणार नाही-प्रताप सरनाईक

“मी घेतलेला निर्णय हा जुनाच आहे. मी फक्त परिवहन मंत्री म्हणून अंमलबजावणी करत आहे, त्यात चुकीचं काय आहे? शशांक राव हे संप करणार आहेत. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी याबाबत परिपत्रक काढलं होतं. तेव्हा शशांक राव यांचे वडील शरद राव यांनी परिपत्रकाला अनुमोदन दिल होतं. आता माघार नाही. ‘एक बार कमिटमेंट की तो मै खुदकी भी सुनता नही’. आपण कोणाच्याही रोजीरोटीवर पाय देत नाही. तुम्ही अरेरावी करणार, हे चालणार नाही. तुम्ही वेळ आणि संधी मागा, आम्ही देऊ. धंदा बंद करणार, मराठी शिकणार नाही असं म्हणणार, हे चालणार नाही.” असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.