मुंबईसह राज्यभरातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या सगळ्यांना जुजबी मराठी शिकण्याठी सरकारने एक वर्षाची मुदत दिली आहे. या वर्षभरात कुठलीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मराठी शिकण्यासाठी आम्हाला वेळ वाढवून द्या अशी मागणी करत रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांचे प्रतिनिधी देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यांच्या भेटीनंतर जी चर्चा झाली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
अमराठी टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत त्यांची संघटना आम्हाला भेटली त्यांच्या प्रतिनिधींनी हे सांगितलं की आम्हाला वेळ वाढवून द्या. आम्हाला इतक्या तातडीने मराठी भाषा शिकणं शक्य नाही. त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आहे की मराठी शिकण्यासाठी या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येईल. एक वर्षभर या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. या एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी हा निर्णय घेतला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करुन जुजबी मराठी शिकतील. त्यांना वेळ वाढवून हवा होता. त्यामुळे या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
संजय निरुपम यांची प्रतिक्रिया काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल मला आनंद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे सांगितलं होतं की मराठी ही प्रेमाची भाषा आहे, ती प्रेमाने शिकली पाहिजे त्याची सक्ती करता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली आहे ती चांगलीच आहे. मी फक्त एक आठवण करुन देऊ इच्छितो की १२ ऑगस्टचा जो जीआर आहे त्यात मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत मराठी न शिकल्यास बॅज आणि परवाना जप्त केला जाईल आणि पुन्हा तीन महिन्यांची मुदत दिली जाईल असं म्हटलं आहे तो जीआर रद्द करावा किंवा सुधारणा करावी ही विनंती करतो आहे असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे.
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रतिनिधींची प्रतिक्रिया काय?
आज मुंबईसह राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महाराष्ट्राचे दिलदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षभराची मुदत दिली आहे. मराठी शिकण्यासाठी ही मुदत देण्यात आली आहे. काही महिन्यांपासून थोडासा दबाव रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर होता. आम्ही सगळी परिस्थिती सांगितली. मराठी बोला आणि महाराष्ट्र जोडा हा कार्यक्रम सुरु करतो असं आम्ही आज मुख्यमंत्र्यांना सांगितलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मुदत द्या अशी विनंती केली होती. त्यानंतर आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदत दिली आहे. आम्ही त्यांचे आभार मानतो असं रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे.
