अयोध्येच्या राम मंदिरात चोरी झाली आहे. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून रामरक्षा आंदोलन सुरु केलं आहे. याच आंदोलनात बोलत असताना उद्धव ठाकरेंनी आम्हाला भाजपामुक्त राम हवा आहे अशी घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दादरच्या हनुमान मंदिरात शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा पठण करण्यात आलं आणि त्यानंतर महाआरती करण्यात आली. यावेळी खासदार संजय राऊत यांची देखील उपस्थिती होती.
आम्हाला भाजपामुक्त राम हवा आहे-उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी अयोध्यमध्ये झालेल्या चोरीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राम मंदिरासाठी कारसेवकांनी रक्त सांडलं आहे, आम्ही भोळे-भाबडे हिंदू आहोत, पण मूर्ख नाही. कुणी मंदिर लुटत असेल तर हिंदू कधीही माफ करणार नाही, असा हल्लाबोल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच राम मंदिराला केलेलं सगळं दान कुठे गेलं असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. हिंदुंचे पैसे लुटता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. त्यामुळे आता राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावर उतरा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली?उद्धव ठाकरेंचा सवाल
शिवसेनेने राम मंदिराला दिलेली चांदीची वीट कुठे गेली? रामरक्षा आंदोलन म्हणजे भर पावसात पेटलेली ठिणगी आहे. शिवसेना संपवण्याचा अफजलखानी विडा त्यांनी उचलाय. त्यामुळे या आंदोलनासाठी सर्वांनी आता एकत्र या, जोपर्यंत या चोरीचा निष्पक्षपातीपणाने निकाल लागला जात नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. अशी मोठी घोषणा देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे, त्यामुळे आता भविष्यात हे आंदोलन अधिक तापण्याची शक्यता आहे. दरम्यान आता जी जाग आली आहे, ती जाग तशीच ठेवा, झोपू नका, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भर पावसामध्ये हे आंदोलन आज मुंबईमध्ये पार पडलं आहे. या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
अयोध्येत हे घडलं असेल तर मथुरा काशीमध्ये काय होईल?-उद्धव ठाकरे
“१२ वर्षे होऊन गेली, आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली. पण त्यानंतर शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी अफजलखानी विडा उचलला. हिंदुत्वाचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात शिवसेनाच निधड्या छातीने प्रश्न विचारू शकते. अयोध्या तो झांकी है, काशी-मथुरा बाकी है, असं त्यांनी म्हटलं आहे. ही अयोध्येची झांकी असेल तर काशी-मथुरा किती लुटतील? भगव्याचं सरकार आलं असं आपल्याला वाटलं होतं. अटलजी म्हणाले होते की अब हिंदू मार नहीं खाएगा, पण हिंदूंना लुटणारं सरकार बसलं आहे. हे दुर्भाग्य आहे. हे आरोप मी करत नाही, हे आरोप अनेकजण करत आहे. शंकराचार्यांनी म्हटलं होतं की केदारनाथमधील सोनं लुटलं आहे. मध्य प्रदेशातील मंत्र्यांनी महाकालची जमीन लुटली आहे. बद्रीनाथमधूनही अपहाराच्या बातम्या येत आहेत”, असेही दाखले उद्धव ठाकरेंनी दिले.
