महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या टोळीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीमध्ये एका व्यायामशाळेच्या मालकाची हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधून बिश्नोई टोळीच्या योगेश कुमारला नुकतीच अटक झाली. हा आरोपी पोलिसांच्या कोठडीत असताना त्याने माध्यमांशी संवाद साधला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून त्यात त्याने बाबा सिद्दिकी यांच्यावर विविध आरोप केले आहेत. “बाबा सिद्दिकी हे चांगले व्यक्ती नव्हते, त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला होता. तसेच त्यांचे आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे संबंध होते”, असा दावा योगेश कुमारने केला आहे.

योगेश कुमारने सांगितले की, बाबा सिद्दिकी हा काही चांगला माणूस नव्हता. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. सामान्य माणसावर तर असा गुन्हा दाखल होत नाही. तसेच त्यांचे दाऊदशी संबंध होते, असेही कळते. दरम्यान योगेश कुमारने कोठडीत असतानाही पत्रकार परिषद घेतल्याच्या थाटात माध्यमांशी संवाद साधल्यामुळे पोलिसांवरही टीका होत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सदर व्हिडीओ आपल्या एक्स अकाऊंटवर टाकून भाजपावर टीका केली आहे.

नाना पटोले म्हणाले, “मृत्यूनंतरही बदनामी करायची, हे हीन कृत्य फक्त भाजपाच करू शकते. नाहीतर एका खुन्याला पत्रकार परिषद कशी घेऊ दिली जाते? दाल मे कुछ काला है.”

शूटरने आणखी काय सांगितले?

एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करायचे असल्यास त्याची माहिती कुठून मिळते? असा प्रश्न योगेशला पत्रकारांनी विचारला. यावर योगेश म्हणाला की, आजकाल मोबाइलमधून सर्व काही माहिती मिळते. गुगल, इंटरनेट यावरून आपल्याला हवी ती माहिती प्राप्त होते. तसेच पिस्तूल चालविणेही शूटर युट्यूब व्हिडीओवरू शिकतात, असेही त्याने सांगितले.

बिश्नोई टोळीचे पुढचे सावज कोण?

बिश्नोई टोळी यापुढे कुणाला लक्ष्य करणार? असाही एक प्रश्न योगेशला विचारण्यात आला. यावर तो म्हणाला की, मी तर आता तुरुंगात चाललो आहे. त्यामुळे मला याची कल्पना नाही. बिश्नोई टोळी खूप मोठी आहे. १०० पेक्षा जास्त लोक या टोळीत आहेत. तसेच देशाबाहेरही आमचे काही सहकारी आहेत, असेही योगेशने सांगितले.

नऊ जणांना अटक

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवारी आणखी पाच लोकांना ताब्यात घेण्या आले. यामुळे आरोपींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. या पाच आरोपींनी हल्लेखोरांना शस्त्र पुरविले होते. तुर्किये, ऑस्ट्रेलिया आणि देशी बनावटीचे हत्यार हल्लेखोरांना पुरविण्यात आले होते. तसेच हल्लेखोरांच्या राहण्याची व्यवस्था आणि त्यांना रसद पुरविण्याचे काम या पाच जणांनी केले होते.

Story img Loader