Babanrao Shinde Madha MLA Ajit Pawar NCP : माढा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख व ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. बबनराव शिंदे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हाती घेणार का? यावर खलबतं चालू आहेत. दुसऱ्या बाजूला, अजित पवार गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असून आगामी निवडणुकीच्या काळात त्या गटातील अनेक आमदार व पदाधिकारी शरद पवार गटात येतील अशा प्रकारचे वेगवेगळे दावे शरद पवार गटातील नेते करत आहेत. त्यामुळे बबनराव शिंदे शरद पवार गटात जातील का यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच आता बबनराव शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची चर्चा आहे. स्वतः बबनराव शिंदे यांनी माढ्यातील नागरिकांशी बोलत असताना याबाबतचे संकेत दिले आहेत.
“आगामी विधानसभा निवडणुकीत मी उभा राहीन की नाही याबाबत शंका आहे”, असं वक्तव्य बबनराव शिंदे यांनी केलं आहे. शिंदे म्हणाले, “माझ्या मुलाला या निवडणुकीत (आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४) एक संधी द्या, तो त्या संधीचं सोनं करून दाखवेल”. बबन शिंदे यांच्याऐवजी या निवडणुकीत त्यांचे पुत्र रणजीत शिंदे हे माढ्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरतील असे संकेत स्वतः बबनराव शिंदे यांनी दिले आहेत. मात्र अजित पवारांचा पक्ष रणजीत शिंदे यांना विधानसभेचं तिकीट देणार की पुन्हा एकदा बबनराव शिंदे यांनाच विधानसभा निवडणूक लढण्याचा अग्रह करणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
हे ही वाचा >> “मोदींनी चूक मान्य केली, आता शिंदे-फडणवीसांनी…”, नाना पटोलेंचा चिमटा; म्हणाले, “पेशव्यांनी महाराष्ट्राचा…”
बबनराव शिंदे नेमकं काय म्हणाले?
बबनराव शिंदे म्हणाले, “आगामी विधानसभा निवडणुकीत रणजीत भैय्याला एक संधी द्या आणि पुढच्या पाच वर्षात मतदारसंघात काय काय कामं होतात, काय नाही ते बघा, तो तुमच्या विश्वासावर खरा उतरेल आणि जर नाही उतरला तर पाच वर्षानंतर सर्व काही तुमच्या हातात आहे. मी देखील सुरुवातीला असाच अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला उभा राहिलो होतो, त्यानंतर सलग सहा वेळा मी आमदार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आलो. त्याचं कारण म्हणजे मी लोकांची कामं केली. लोकांमध्ये मिसळून त्यांच्यासाठी कामं केली”.
हे ही वाचा >> Narendra Modi : “प्रायश्चित्त अटळ आहे, भ्रष्टाचाराला महाराजांनी…”, पंतप्रधान मोदींच्या माफीनंतर शरद पवार गटाचा टोला
बबनराव शिंदे म्हणाले, “कामाच्या माणसाला निवडून देणं गरजेचं आहे. मी प्रत्येक वेळी निवडून आल्यावर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त कामं, चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. गरिबातला गरीब माणूस दिसला तरी मी कार थांबवून त्याच्याशी बोलतो. रणजीत भैय्यादेखील तसंच काम करेल”.