मुंबई : परभणी जिल्हा बँकेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी अप्पर निबंधक पांडुरंग खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली असून, ही चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्याची घोषणा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत हरिष पिंपळे,प्रकाश साळुंके, विजय वडेट्टीवार, प्रशांत बंब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान पाटील बोलत होते. या बँकेच्या पाथरी, मानवत, वसमत, गंगाखेड, वझुर व शेळगाव यांच्यासह १०३ शाखेतून ८२ कोटी ४० लाख रकमेचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत तक्रारी आल्या आहेत.
तसेच नोकर भरती, बेकायदेशीर कर्जवाटप अशा विविध नियमभंग आणि गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच बँकेतील झालेला गैरव्यवहार सिद्ध झाल्यास रिझर्व्ह बँकेला कळवून या बँकेची परवानगी रद्द केली जाईल असेही पाटील यांनी सांगितले.
