राज्यातील शिंदे गट-भाजपाचे सरकार कधीही कोसळू शकते, असा दावा ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी, काँग्रेसकडून केला जातो. तर दुसरीकडे आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास शिंदे गट आणि भाजपाकडून व्यक्त केला जातो. असे असतानाच आमदार तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. येत्या १५ दिवसांत इतर पक्षांतील २० ते २५ आमदारांचा शिंदे गट-भाजपात प्रवेश होऊ शकतो, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. कोर्टातील प्रलंबित खटल्यामुळे पक्षप्रवेश तसेच मंत्रिमंडळ विस्तार लांबत आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.
हेही वाचा >>> मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार का? प्रश्न विचारताच चंद्रकांत खैरे भडकले; रागात म्हणाले “हट्, ज्यांनी…”
दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे
“सरकार पडण्याचे काहीही कारण नाही. सरकार बहुमतात नव्हे तर अतीबहुमतामध्ये आहे. म्हणजेच २० ते २५ आमदार इकडे-तिकडे झाले, तरी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. इतर पक्षातील काही आमदार आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तार कोर्टाकडून दिली जाणारी तारीख आणि आमदारांचा पक्षप्रवेश यामुळेच लांबतो आहे. दहा ते पंधरा आमदार फुटण्याची शक्यता आहे. येत्या पंधरा दिवसांत अधिवेशनाच्या अगोदरच या आमदारांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडे सध्या आमदारच राहिलेले नाहीत. यामुळे अन्य पक्षातील आमदारही आमच्याकडे येणार आहेत,” असे बच्चू कडू यांनी सांगितले.
एवढीच हौस असेल तर एकनाथ शिंदे यांच्या जागेवरून लढावे
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले होते. माझ्याविरोधात वरळी मतदारसंघातून लढा असे आदित्य ठाकरे म्हणाले होते. यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आव्हान देणे आता जुने झाले आहे. या आव्हानांना काहीही अर्थ नाही. हा थोडा बालीशपणा आहे. जेव्हा विधानसभा निवडणूक जाहीर होईल, तेव्हा त्यांनी आव्हान दिले पाहिजे. एवढीच हौस असेल तर एकनाथ शिंदे यांच्या जागेवरून लढावे,” असे बच्चू कडू म्हणाले.