Bacchu Kadu confirms joining Shivsena: गेल्या काही दिवसांपासून चाललेल्या राजकीय चर्चांवर अखेर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी पडदा टाकला आहे. आपण शिवसेनेचा धनुष्यबाण पुन्हा हाती घेत आहोत, असं बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळणार असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागल्या होत्या. यासाठी बच्चू कडू प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन करणार असल्याचं बोललं जात होतं. यासंदर्भात बच्चू कडूंनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नेमकी भूमिका स्पष्ट केली आहे. यानंतर दुपारी पक्षप्रवेशाच्या वेळी बच्चू कडूंनी आपण आता पुढची १५-२० वर्षं जे काही राजकारण असेल, ते शिवसेनेतच राहील, असंही स्पष्ट केलं. यावेळी एकनाथ शिंदेंनी बच्चू कडूंच्या विधानपरिषद उमेदवारीचीही घोषणा केली.

मुद्दे मान्य झाल्यानंतरच निर्णय घेतला – बच्चू कडू

आपण पक्षप्रवेशासाठी ठेवलेल्या सर्व अटी एकनाथ शिंदेंनी मान्य केल्याचं यावेळी बच्चू कडू म्हणाले. “शिवसेनेचा धनुष्यबाण मी हाती घेत आहे. काल-परवा याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेनं स्वीकारले आहेत. हमी भावातील सुधारणा, लाडक्या बहिणींमधल्या विधवा बहिणींचा मुद्दा, दिव्यांगाच्या मंत्रालयाचं बळकटीकरण हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच हा निर्णय मी घेत आहे. मी प्रामाणिकपणे काम करत राहीन. शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्यांची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्यावर कोणतीही तडजोड होणार नाही. शिंदेंच्या नेतृत्वाखाली दिव्यांग मंत्रालय उभं राहिलं. पण त्याच्या बळकटीकरणासाठी काम झालं पाहिजे”, असं ते म्हणाले.

आता शिवसेनेतच राहणार – बच्चू कडूंनी केलं स्पष्ट

“आज मी धनुष्यबाण हाती घेतला आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शेतकरी व दिव्यांगांसाठी हा धनुष्यबाण मी उचलला आहे. आता शिवसेनेतच प्रामाणिकपणे व तेवढ्याच ताकदीने माझा राजकारणातला प्रवास एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात होणार आहे. माझी सुरुवात शिवसेनेपासून झाली. आता पुढची १५-२० वर्षं जे काही राजकारण असेल तेही शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात राहील अशी ग्वाही मी आज देतो”, अशा शब्दांत पक्षप्रवेशाबाबत बच्चू कडूंनी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनेकडून बच्चू कडू व नीलम गोऱ्हे या दोन नावांची घोषणा एकनाथ शिंदेंनी विधानपरिषद निवडणुकीसाठी केली.

प्रहार संघटनेचं आता काय होणार?

दरम्यान, संघटनेचे प्रमुखच शिवसेनेत गेल्यामुळे आता प्रहार संघटनादेखील शिवसेनेत विलीन होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेच्या भवितव्याबाबत स्पष्टीकरण दिलं. “प्रहार सामाजिक संघटना व प्रहार दिव्यांग संघटना कायम राहणार. प्रहार सामाजिक संघटना महाराष्ट्रात राहील. ज्यांना राजकीय काम करायचंय ते शिवसेनेत येतील आणि ज्यांना सामाजिक काम करायचंय ते प्रहार संघटनेत राहतील. आम्ही पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल यासाठी काम करणार. पण रक्तातला प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावेल, तितकाच शेतकरी मजूर दिव्यांगांसाठी धावणार आहे”, असं ते म्हणाले.

बच्चू कडूंनी शिवसेना का सोडली होती?

दरम्यान, कधीकाळी शिवसेनेचे कार्यकर्ते असणाऱ्या बच्चू कडूंनी नंतर शिवसेना सोडून वेगळी वाट धरली. पण आपण तेव्हा शिवसेना का सोडली होती? यावरदेखील बच्चू कडूंनी यावेळी भाष्य केलं. “मी राजकीय प्रवासाला शिवसेनेतून सुरुवात केली होती. आम्ही बाळासाहेब ठाकरेंना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पत्र लिहिलं होतं. तेव्हा कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर आम्ही शिवसेनेचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकरी, दिव्यांगांच्या मुद्द्यांवर शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहे”, असं बच्चू कडूंनी यावेळी सांगितलं. “या काळात संघटना चालवणं कठीण आहे हे आम्हाला समजलं होतं. शिवसेनेतला माझा जन्म आहे. शिवसेनेतच शेवटपर्यंत राहावं एवढीच इच्छा आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

राणा दाम्पत्याशी वैर संपणार?

“आमचं कुणाचंही वैयक्तिक वैर नाही. आमचं काही देवेंद्र फडणवीसांशीही वैर नाही. मुद्द्यावर चर्चा आणि वाद होतात. आम्ही काय कुस्ती खेळायला निघालो आहोत का?” असा प्रश्न करत बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याशी असणारं वैरदेखील आता संपल्याचं जाहीर केलं आहे.