अमरावती: शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे त्यांचे म्हणणे आहे. बच्चू कडू यांनी सोबतच भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्‍यावरही टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी विरोधी पक्षात असताना कापसाला ८ हजार रुपये भाव मागितला होता, पण सत्ता आल्यानंतर ते शांत बसले, असे बच्चू कडू म्हणाले.

काँग्रेसच्या काळातही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी काँग्रेसवरही टीका केली. बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसच्या सरकारमध्येही शेतकऱ्यांचे हालच झाले. सत्तेच्या बाहेर आहेत, म्हणून शेतकऱ्यांची आठवण काढायची आणि सत्ता येताच शेतकऱ्यांना दूर सारायचे, असे होता कामा नये. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन केले, त्याचे आम्ही स्वागतच करतो. पण, तुम्ही तुमच्या शब्दावर कायम राहिले पाहिजे. भाजपचे मंत्री गिरीश महाजन जेव्हा सत्तेत नव्हते, तेव्हा त्यांनी कापसाला ७ ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मागितला होता. त्याला दहा वर्षे उलटून गेली आहेत. सत्ता येताच मात्र ते शांत बसले, असे होता कामा नये.

घोडेबाजार नव्हे हा हत्तीबाजार

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घोडेबाजार भरल्याचा आरोप होत असताना त्यावर बच्चू कडू म्हणाले, याला घोडेबाजार म्हणणे कमी होईल. सध्या तर हत्तीचाच बाजार भरला आहे. महाराष्ट्रात पेपरफुटीचा कायदा अंमलात आहे. हा कायदा आणण्यासाठी पहिले पत्र मी दिले. तेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी होते. देशात कर्नाटकनंतर महाराष्ट्रात हा कायदा लागू झाला. त्याचा मजबुतीने कसा वापर केला जाईल, याचा आम्ही प्रयत्न करू.

हर्षवर्धन सपकाळ यांचे आभार

बच्चू कडू म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले, त्याबद्दल त्यांचे आभारच मानले पाहिजेत. ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे, त्या ठिकाणी कांद्याला काय भाव दिला जातो, हे तपासले पाहिजे. विरोधात आहे, म्हणून त्यांना शेतकरी आठवतो. सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडतो. आम्ही सत्तेत असूनही शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांखेरीज आम्ही बोलूच शकत नाही. आमच्या डोक्यात सर्वप्रथम शेतकरी, दिव्यांग बांधव राहतील, हे आम्ही आधीपासूनच सांगत आलो आहे. आगामी खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीसाठी ट्रॅक्टरला डिझेल पुरवायला हवे. ट्रॅक्टरधारकांना अधिक सूट दिली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त डिझेल आरक्षित केले पाहिजे.