scorecardresearch

“एवढं काय त्यात डोकं…”, भाजपाच्या विधानपरिषद निवडणुकीतील विजयावर बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया!

नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवर राज्यमंत्री बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया!

bachchu kadu on nagpur akola mlc election
नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकांच्या निकालांवर राज्यमंत्री बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया!

नागपूर आणि अकोला या दोन विधानपरिषद जागांच्या निवडणुकांचे निकाल आज राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू करण्यासाठी कारणीभूत ठरले. या दोन्ही ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांनी मोठ्या फरकानं विजय मिळवले असून नागपूरमध्ये काँग्रेस तर अकोल्यात शिवसेनेचा पराभव केला आहे. हे निकाल म्हणजे आगामी विजयांची नांदी असल्याची प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असताना दुसरीकडे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यावर खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

नागपूर आणि अकोला विधानपरिषद जागांचे निकाल आज हाती आले. यामध्ये नागपूर विधानपरिषदेची जागा भाजपाने जिंकली असून चंद्रशेखर बावनकुळे तिथून निवडून आले आहेत. बावनकुळेंनी काँग्रेसनं पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला आहे. तर दुसरीकडे अकोल्यामध्ये भाजपा उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी शिवसेना उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांचा पराभव केला आहे. यावरून भाजपा आणि सत्ताधारी पक्षांमध्ये राजकीय दावे-प्रतिदावे केले जात असताना बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

१ हजार मतांमध्ये मुसंडी म्हणजे काय?

बच्चू कडू यांनी या निकालांवर आणि त्यानंतर भाजपानं मुसंडी मारल्याच्या चर्चेवर निशाणा साधला आहे. “ती मतं किती आहेत? १ हजार मतं आहेत. एक हजार मतांमध्ये मुसंडी घेतली म्हणजे काय? तेवढी मतं तर ग्रामपंचायत सदस्यालाही निवडून येण्यासाठी आवश्यक नसतात”, असं बच्चू कडू म्हणाले.

Nagpur MLC Election : बावनकुळेंच्या विजयावर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “मी स्वत: निवडून आलो, तेव्हा…!”

हा वैयक्तिक विजय!

दरम्यान, यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी भाजपानं या विजयाचं भांडवल न करण्याचा अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. “हा काही मुसंडी वगैरे घेतल्याचा प्रकार नाही. हा वैयक्तिक स्वरूपाचा विजय आहे. हे माध्यमांनी एवढं काही मनावर घेऊ नये. ग्रामपंचायत सदस्यांना निवडून येण्यासाठी २ हजार मतं लागतात. त्यामुळे एवढं काय त्यात डोकं घालायचं?”, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी यावर खोचक शब्दांत निशाणा साधतानाच या विजयामुळे महाविकास आघाडी सरकारचं फार काही नुकसान झालं नसल्याचंच सूचित केलं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; नागपूर, अकोल्यात भाजपानं मारली बाजी!

फडणवीस म्हणतात, भविष्यातील विजयाची नांदी!

“चंद्रशेखर बावनकुळेंना मोठा विजय मिळाला आहे. खरंतर मी स्वत: निवडून आलो, तेव्हा झालेल्या आनंदापेक्षाही जास्त आनंद आज बावनकुळेंच्या विजयाचा झाला आहे. या विजयाने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. अकोल्यात वसंत खंडेलवाल यांनीही निर्णायक विजय मिळवला आहे. विधानपरिषदेच्या सहा पैकी चार जागी भाजपा निवडून आली आहे. महाविकास आघाडीत तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचे विजय होऊ शकतात, असं मांडलं जात असलेलं गणित चुकीचं आहे हेही या विजयानं स्पष्ट केलं आहे. राज्यातली जनता भाजपाच्या पाठिशी आहे आणि भविष्यात देखील आम्हाला आशीर्वाद मिळेल. बावनकुळेंचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे”, असं फडणवीस म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bachchu kadu mocks bjp celebration in nagpur akola mlc election pmw

ताज्या बातम्या