Bachchu Kadu speech Tukaram Mundhe praise: “तुकाराम मुंढे अजून थोडं चांगलं वागले तर, दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांना तिथं ठेवायला पाहिजे. माझ्या भागात गुटखा विक्री बंद झाली. सरकार जे करु शकत नाही ते एक अधिकाऱ्याने करुन दाखवलं, खेड्या-गावातील गुटखा विक्री बंद झाली, मी त्यांचे आभार मानतो”, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी विधानपरिषदेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचे कौतुक केले. तसेच, मुंढेंना दुधाच्या भेसळीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन कडू यांनी सभागृहात बोलताना केली.

दुधातील भेसळीवर बोट

“दुधातील भ्रष्टाचार कमी झाला, त्यातील भेसळ कमी झाली तर दुधाचे भाव मागावे लागतील का शेतकऱ्यांना? असा सवाल कडू यांनी सभागृहात बोलताना उपस्थित केला. ५० टक्के दुधावर अजूनही भेसळ होत आहे, कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे, माणंस मरायला लागली आहेत. पण,ही भेसळ बंद होत नाही. सरकार आमचं-तुमचं सगळ्यांचं आहे. पण, अजूनही दुधातील भेसळ कमी झाली नाही, त्यामुळे कॅन्सरचे प्रमाण १० ते १५ टक्के वाढले आहे”, असे कडू म्हणाले. “सरकार आपलं आहे, बोलू नको बाबा, असे म्हणणाऱ्यातील आम्ही नाही, एक शेतकरी पूत्र म्हणून आम्ही इथं बोलतोय”, असेही कडूने पुढे स्पष्ट केले.

फडणवीस-एकनाथ शिंदेंचे कौतुक

कर्जमाफीवर बोलताना बच्चू कडू यांनी रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस आंदोलन केल्याचे सांगितले. “मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन दिव्यांगांचा हफ्ता अडीच हजार रुपये केला, त्यांनी तो शब्द पाळला”, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. “जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आले. अनाथांचा नाथ एकनाथ हे त्यांनी सिद्ध केलं. ज्यांना हात, पाय, डोळे नाहीत त्यांंच्यासाठी धावून जाणारे एकनाथ शिंदे पहिले मुख्यमंत्री ठरले”, अशा शब्दात बडूंनी एकनाथ शिंदे यांचे देखील आभार मानले.

कर्जमाफीवर भाष्य

बच्चू कडू यांनी सात दिवसांच्या आंदोलनाचा उल्लेख देखील सभागृहात केला. “५५० किलोमीटरचा पायी प्रवास केला, ३५० सभा महाराष्ट्रात घेतल्या. ७५,००० किलोमीटरचा प्रवास केला. कर्जमाफी देत असताना काही प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना किती द्यायचे? असा प्रश्न करतात अशी भाषा कानावर पडते त्यावेळी असं वाटतं की, पुन्हा छत्रपतींची तलवार घ्यावी आणि छाटून टाकावे एकेकाला”, असा संतापही कडूंनी व्यक्त केला.