लोकसत्ता वार्ताहर संगमनेर : गावचा सरपंच मागासवर्गीय समाजाचा झाल्याच्या रागातून संबंधित सरपंचाच्या गळ्यात चपलांचा हार घालत त्याला धक्काबुक्की करण्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील कसारे गावी घडला. या प्रकरणी  दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तालुक्यातील कसारे गावचे सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे (वय २८, रा. कसारे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णाजी सूर्यभान कार्ले आणि मच्छिंद्र हिरामण कार्ले ( दोन्ही  रा. कसारे ता संगमनेर ) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. बोराडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की आपण मुलीला घेऊन तळेगाव येथे दवाखान्यात जात असताना वरील दोघा आरोपींनी पाठीमागून येत आपल्या दुचाकीला त्यांची दुचाकी आडवी लावली. नंतर आपल्या गळ्यात जुन्या चपलांचा हार घालून मागासवर्गीय सरपंचांचा सत्कार आम्ही असाच करतो असे म्हणत आपला पाणउतारा केला. या वेळी आपली बहीण पुढे आली असता तिच्यासह आपणाला धक्काबुक्की देखील करण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Backward sarpanch insulted in sangamner taluka zws
First published on: 28-10-2021 at 00:55 IST