पुरवठा झालेली खराब राजगिरा चिक्की येत्या ४८ तासांत पुरवठादाराला परत करा, असा आदेशच एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी जिल्हा परिषदेला धाडला आहे. काल, सोमवारी हा आदेश येथे प्राप्त झाला. मात्र तो गेल्या गुरुवारी (दि. ९) काढण्यात आला होता. राजगिरा चिक्की जप्त करण्याच्या मुद्यावरून जिल्हा परिषदेने केलेले घूमजाव पाहता जि.प. पदाधिकारी आयुक्तांच्या आदेशापुढे झुकले, असेच स्पष्ट होत आहे. पदाधिकाऱ्यांना झुकवण्यात येथील अधिकाऱ्यांनीही मोठा हातभार लावल्याची चर्चा होत आहे.
मातीमिश्रित राजगिरा चिक्कीने राज्यभर गदारोळ निर्माण केला आहे. गुरुवारी आदेश निघाल्यानंतरच येथे महिला व बालकल्याणच्या सभापतींसह समितीने प्रथम घूमजाव केले. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज ससे आहेत. त्यांनाच आयुक्तांनी चिक्की परत पाठवण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर स्थायी समितीत अशीच बदललेली भूमिका काही सदस्य व पदाधिकाऱ्यांनी घेतली. या समितीची सभा होईपर्यंत पदाधिकारी व सदस्यांना या पत्राची कल्पना नव्हती. ती आज, मंगळवारी देण्यात आली.
जि.प.ने चिक्की जप्त केली, त्याच वेळी बालविकास आयुक्तांनी जि.प.ला पत्र पाठवून खराब चिक्की परत पुरवठादाराला देण्याचा व त्या बदल्यात चांगली चिक्की घेण्यास सांगितले होते. मात्र पदाधिकारी व काही सदस्यांनी चिक्की परत पाठवण्यास नकार दिला होता. चिक्कीचा केवळ एक नमुना सरकारी प्रयोगशाळेत तपासून आलेला आहे. तो खाण्यालायक असल्याचा अहवाल आहे. मात्र या अहवालाबद्दल सदस्यांनीच शंका उपस्थित करण्यात आलेली आहे. सर्वसाधारण सभेतच खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतही तीन नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे ठरेल होते. हे नमुने अद्यापि तपासणीसाठी पाठवले गेलेले नाहीत, तोच हा आदेश येथे प्राप्त झालेला आहे.
चिक्की परत पाठवल्यानंतर किती चिक्की खराब आढळली. अंगणवाडीतून वितरित झालेली पाकिटे व सीडीपीओंकडे डिपॉझिट करण्यात आलेली पाकिटे, त्याची तारीख, खराब चिक्कीचे बॅच क्रमांक, एकूण सीलबंद केलेली पाकिटे, एकूण खराब पाकिटे याचा आढावा देणारा अहवालही सादर करण्यास आयुक्तांनी सांगितले आहे.
कार्ले यांची हरकत
खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत चिक्कीचे नमुने तपासणीसाठी पाठवून त्याचा अहवाल येईपर्यंत जिल्हा परिषदेने जप्त केलेली चिक्की परत पाठवू नये, नगर व भिंगार येथील प्रकल्पाची जप्त केलेली चिक्की परत देण्यास आपला विरोध असल्याचे नगर पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी स्पष्ट केले. त्यांनीच सर्वात प्रथम चिक्की खराब असल्याची तक्रार केली होती.