Badlapur School Case Radhakrishna Vikhepatil Maharashtra Band : “बदलापूरची घटना अतिशय दुर्दैवी होती, सर्वच समाजघटकांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून बदलापूरमध्ये सरकारने कारवाईसाठी निर्णय घेतले आहेत. मात्र, महाविकास आघाडीकडून जाणीवपूर्वक या घटनेचं राजकारण चालू आहे”, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ व या घटनेनंतर कारवाईस दिरंगाई करणाऱ्या सरकारविरोधात मविआने २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यावरून विखे पाटलांनी मविआवर टीका केली आहे. “बदलापूरला तातडीने जाणारे महाविकास आघाडीचे नेते पश्चिम बंगालमध्ये एवढी मोठी घटना घडली असताना त्याबाबत गप्प का राहिले?” असा प्रश्न देखील विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “बदलापूरच्या घटनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एसआयटी नेमून या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेच्या तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलीस आधिकाऱ्यांवरही कारवाई झाली आहे. सरकारने पीडित मुलींना न्याय देण्यासाठी हा खठला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवण्याचा निर्णय घेतलेला असताना केवळ या घटनेच्या आडून राजकारण करण्याची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली आहे दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये सुध्दा घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी होती. या घटनेचा जगभरातून निषेध होत आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते या घटनेचा निषेध करायलासुध्दा तयार नाहीत”.
विखे पाटलांची संजय राऊतांवर टीका
“बदलापूर व कोलकाता या दोन प्रकरणांवर मविआच्या दोन वेगवेगळ्या भूमिका आहेत. याचाच अर्थ महाविकास आघाडीच्या नेत्यांना ममता बॅनर्जी यांच्या पदराखाली लपायचे आहे”, असा टोला मंत्री विखे पाटील यांनी लगावला. विखे पाटील म्हणाले, “अतिशय संवेदनशील अशा घटनेवर संजय राऊत अतिशय वेगळ्या थराला जाऊन बोलत आहेत, त्यांनी जनाची नाही, मनाची ठेवली तरी पाहीजे. महाविकास आघाडीने पुकारलेला बंद म्हणजे केवळ भावनेला हवा देऊन उद्रेक करण्याचा प्रयत्न आहे”.
हे ही वाचा >> Badlapur Case : “ठाकरे सरकारच्या काळात…”, बदलापूर प्रकरणानंतर फडणवीसांचं मविआकडे बोट; म्हणाले, “तुम्ही संवेदनाहीन होऊन…
नाना पटोलेंना टोला
विखे पाटलांनी कॉग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली. पटोलेंनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले, “आम्ही आरशात दिसण्याची वाट का पाहता? धनाजी, संताजी सारखे आम्हीच तुम्हाला दिसतो कारण आमचे सरकार काम करणारे आहे. तुमच्याकडे कोणी पाहत नाही. म्हणूनच बदलापूरच्या घटनेतून राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहात”.