राहाता: कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे परिसरात एका गोदामात बनावट खतांच्या ६ लाखांहून अधिक किंमतीच्या ३०० खतांच्या गोण्या आढळल्या आहेत. कृषी विभागाने पंचासमक्ष गोण्यांमधून नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. प्राथमिक तपासात विविध कंपन्यांच्या नावाने मोठ्या प्रमाणात खतांचा साठा केल्याचे निदर्शनास आल्याची माहिती
गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बीरदवडे यांनी दिली.कृषी विभागाच्या या सलग चौथ्या कारवाईमुळे अवैधपणे बोगस खतांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
बनावट खतांच्या गोण्यांचे पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती कृषी विभागाला मिळाल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली. कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रक निरीक्षक गणेश बीरदवडे यांनी ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी व त्यांच्या पथकाने देर्डे कोऱ्हाळे येथील गोदामावर छापा टाकला.तेथे विविध कंपन्यांच्या नावाने सुमारे ३०० हून अधिक गोण्या आढळल्या. सुमारे ६ लाख १५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संबधित व्यक्तीविरुद्ध खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात बनावट खतांचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. पीक उत्पादन वाढावे, चांगला दर्जा मिळावा या आशेने शेतकरी बाजारातून खत खरेदी करतात; मात्र काही विक्रेते बनावट अथवा निकृष्ट दर्जाचे खत विकून त्यांच्या घामाच्या पैशांवर डल्ला मारत असल्याचे उघड झाले आहे. काही ठिकाणी खतांच्या गोण्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवल्या होत्या; मात्र खरेदी-विक्रीची वैध कागदपत्रे सादर करण्यात विक्रेत्यांना अपयश आले. नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बनावट खतांमुळे पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतीचा खर्च वाढणे अशा समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्या कंपनीच्या नावाच्या गोण्या आढळल्या, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित खत आमच्या कंपनीचे नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे बनावट पॅकिंगद्वारे फसवणूक होत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
शेतकऱ्यांनी पॅकिंगवरील तपशील तपासावा
बोगस खत विक्री करणाऱ्यांविरोधात खत नियंत्रण आदेश व अत्यावश्यक वस्तू कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी खतखरेदी करताना पावती घ्यावी, पॅकेजिंगवरील तपशील तपासावा आणि संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा,-मनोज सोनवणे, कोपरगाव, तालुका कृषी अधिकारी
