सावंतवाडी: तिलारी खोऱ्यातील (ता. दोडामार्ग) मोर्ले-केर परिसरात पाच जंगली हत्तींच्या कळपाने मोठी दहशत निर्माण केली आहे. सोमवारी सकाळी ‘बाहुबली’ नावाच्या हत्तीने मोर्ले-घोटगेवाडी रस्त्यावर सुमारे अर्धा तास ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. याच दरम्यान हत्ती अचानक समोर आल्याने मोटारसायकलवरून पडून बहीण-भाऊ किरकोळ जखमी झाले.
सध्या काजूचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला काजूचे बोंडू टाकले होते. या बोंडूच्या वासाने आकर्षित होऊन बाहुबली हत्ती थेट रस्त्यावर आला आणि बोंडू खाण्यासाठी रस्ता अडवून धरला. अखेर वन कर्मचारी आणि हाकारे यांनी हत्तीला जंगलात हाकलून लावले. दुसरीकडे, ‘ओंकार’ हत्ती सध्या गोव्यातील मोपा परिसरात वावरत असून बाहुबली हत्ती मोर्ले भागात असल्याने वन विभाग आणि बागायतदारांची मोठी ओढाताण होत आहे.
गेल्या २३ वर्षांपासून दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करण्याची मागणी होत आहे, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. केवळ आश्वासने देऊन प्रशासनाकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी
