बीड जिल्ह्यात विलास घुले हत्या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विलास घुले हत्या प्रकरणातील सूत्रधार कोण? यावरून परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ९ आरोपींना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विलास घुले हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचं नाव आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आता खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या मुलावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ‘माझ्या मुलाची चूक असल्यास अटक करा, पण विनाकारण अडकवू नका’, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“विलास घुले हत्या प्रकरणाच्या घटनेबाबत मी याआधी सांगितलं की, ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेचं कोणीही समर्थन करणार नाही. मात्र, या प्रकरणात माझ्या मुलाचं नाव घेतलं जात आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. मी पोलिसांना याआधी देखील सांगितलं की, माझा मुलगा बीड जिल्ह्यातच आहे आणि पोलिसांना जी काही चौकशी करायची त्यासाठी आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. आजही माझी भूमिका तिच आहे. आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. मी माझ्या मुलाला कुठेही पळवून लावलं नाही किंवा लावणार नाही”, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

“जर माझ्या मुलाने चूक केली असेल तर त्याला अटक झाली पाहिजे. पण जर माझ्या मुलाने चूक केली नसेल तर विनाकारण अडकवणं चुकीचं आहे”, असंही खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

विलास घुले हत्या प्रकरणात आमदार धनंजय मुंडे आक्रमक

धनंजय मुंडे यांनी आज विलास घुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी धनंजय मुंडे यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘विलास घुले हत्या प्रकरणात पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली, मग एका आरोपीला अटक का केली नाही? तो लाडका आहे का?’, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. धनंजय मुंडे म्हणाले की, “विलास घुले हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची गरज आहे. या घटनेतील ९ आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, आणखी एका आरोपीला अटक केलं नाही. तो एक आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? ३०२ मध्ये एखाद्या आरोपीला अटक होत नाही, का? तर त्याची वेगळी तपासणी सुरू आहे. त्या एका व्यक्तीला पोलिसांना या प्रकरणातून बाहेर काढायचं आहे का? या घटनेतील जे काही पुरावे आहेत, ते नष्ट करण्यासाठी त्या आरोपीला बाहेर ठेवलं जात आहे का?”, असे सवाल धनंजय मुंडे यांनी केले.

“विलास घुले हत्या प्रकरणातील एक आरोपी अजूनही मोकाट आहे. त्यामुळे ही भिती आहे की त्या आरोपीने जर या घटनेतील काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर या प्रकरणातून काय बाहेर येईल? आमचा आता पोलिसांवर असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे. त्यामुळे पोलीस त्याला अटक करत नाही. आज आम्ही सर्वांच्या उपस्थितीत सांगतो की त्या आरोपीला पोलिसांनी अटक करावी. एखाद्या गुन्ह्यात एकाला एक न्याय आणि दुसऱ्या गुन्ह्यात दुसऱ्याला वेगळा न्याय?”, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.