Bajrang Sonawane: विलास घुले हत्याप्रकरणावरुन बीडमध्ये राजकारण तापले आहे. घुले यांच्या हत्येच्या प्रकरणातील आरोपीच नव्हे तर या कटाचा सूत्रधार कोण? याचा देखील शोध घेण्याची मागणी मंगळवारी परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली. यानंतर आता होणाऱ्या विविध आरोपांवर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली. “तो काय नेता आहे? मी काय घाबरत नाही, मी बीडचा वाघ आहे”, अशी प्रतिक्रिया सोनवणे यांनी दिली आहे.
पोलिस तपास सहकार्य करणार – खासदार सोनवणे
विलास घुले हत्याप्रकरणी त्यांच्या कुटंबियांकडून सौरभ सोनवणे यांच्यावर संशय व्यक्त केला जात असल्याचा प्रश्न खासदार बजरंग सोनवणे यांना विचारण्यात आला. यावेळी केज तालुक्यात घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे बजरंग सोनवणे म्हटले. “ही घटना कशामुळे घडली? का घडली? याच्या खोलात गेलं पाहिजे. भाडणं का झाली? घुले त्याठिकाणी गेला आणि हा प्रकार घडला. या प्रकरणात मुलाचं नाव येतंय त्यात जाणिवपूर्वक राजकारण आहे. कुटुंबियांचा संशय असेल पण, आमच्या इथं किड लागलेले राजकारण केलं जातंय, मुंबईत बसून लोकांना चेतावलं जात आहे पण, मी पोलिस यंत्रणेला मदत करणार, माझा मुलगा, मी, कुटंब आणि कार्यकर्ते तपासाला सहकार्य करतील”, असे बजरंग सोनवणे म्हणाले.
धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष टीका
मस्साजोग हत्याप्रकरणाचा संदर्भ देत होणाऱ्या राजकारणावर बोलताना खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. “तो काय नेता आहे का? त्याला नेता म्हणत्यात का? वाद लावणारे नेते राजकारणात अकार्यक्षम असतात, राजकारणात फिल्डवर उतरुन, रात्र-दिवस काम करावे लागते, मुंबईत बसून कामं होत नाहीत”, असे खासदार सोनवणे म्हणाले. तुम्ही नेत्याचं नाव घेत नाही? असे विचारले असता, “मी काय भित्रा आहे का? बीडचा वाघ आहे”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंनी उठवला आवाज
बीडच्या केज तालुक्यात २० जून रोजी एका व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी रचलेल्या कटादरम्यान विलास घुले यांचा जीव गेला. घुले यांच्यावर हल्लेखोरांनी वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागे पूर्वनियोजित कट असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. विधानसभेत मुंडेंनी घुले यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत कटाचा सूत्रधार शोधण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी देखील या प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश गृह खात्याला दिले आहेत. पंकजा मुंडे यांनी देखील याप्रकरणी निष्पक्ष तपास करण्याची सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
