Bajrang Sonawane Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरणात अचानक मुलाचे नाव कसे पुढे आले? असा सवाल उपस्थित करत खासदार बजरंग सोनवणे यांनी, “मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, मी दोषी असेन तर माझ्यावर कारवाई करावी”, अशी भूमिका स्पष्ट केली. दोषींवर कारवाई झाली पाहिजे असे सांगताना सोनवणे यांनी विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. यावेळी खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत, “त्याच्या अगोदर मी चौकशीची मागणी केली होती”, असे सांगितले.
मुलगा दोषी असेल तर कारवाई करावी – सोनवणे
केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणात मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी भूमिका स्पष्ट केली. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची विधानसभेत बोलताना चौकशीची मागणी केल्याचे सोनवणे यांना विचारले असता, सोनवणे यांनी मुंडेंचा एकेरी उल्लेख केला. “ते काय म्हणतंय ते जाऊद्या, त्याच्या अगोदर मी चौकशीची मागणी केली, मी माथे भडकवायची कामं करत नाही, लोकांना शांत करुन त्यांना न्याय द्यायचं काम करतो. त्या कुटुंबाला सहकार्य झालं पाहिजे. आणि खरंच माझा मुलगा दोषी असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, मुलाला कुठेही पळवून लावत नाही, तो तिथेच आहे, त्याची चौकशी करावी”, असे खासदार सोनवणे म्हणाले.
धनंजय मुंडेंना इशारा
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की, “माझ्या घराची सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आहेत, मुलाचे सीडीआर घेण्यात आले आहेत, माझे देखील सीडीआर देण्यास मी तयार आहे. खासदार म्हणून त्यासाठी आवश्यक परवानगी देखील देण्यास मी तयार आहे.” चौकशीची मागणी यापूर्वीही केली होती आता देखील तीच मागणी असल्याचेही खासदार सोनवणे यांनी स्पष्ट केले. कोण सूड उगवतंय का? यावर बोलताना, “कोण सूड उगवणार? मला यांचं सगळं माहितेय, यांची अंडी-पिल्ली काय आहेत ती? ही कोण आहेत ती? लोकांना पेटवतंय कोण? चिथावणी देणारी भाषणं कोण करतंय? रात्रीच्या कामातून दिवसा यायला सवड तर भेटली पाहिजे ना?”, असा शब्दात सोनवणे यांनी संताप व्यक्त केला.
बजरंग सोनवणे कोण आहे ते दिसेल?
खासदार सोनवणे यांनी यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता टीका केली. “तुम्हाला २५ वर्षे या पठ्याने मदत केली ते आठवून बघा, आणि नंतर माझ्याकडे बोट करा. माझ्या लेकरांपर्यंत गेला का? तुला दाखवतोच, माझी लेकरं चांगली आहेत, त्याचं वाईट वाटतं का? तुम्ही पापं कराल आणि आमच्या नावावर बिल फाडाल तर ते सोप जाणार नाही, पुढच्या काळात बजरंग सोनवणे कोण आहे ते दिसेल”, असा इशाराच सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता दिला. तसेच, पोलिसांवर यासाठी राजकीय दबाव येत असल्याचा दावा देखील त्यांनी फेटाळून लावला, विरोधी पक्षात असताना देखील पोलिसांवर दबाव येत असेल तर माझ्या कतृत्वाचा अभिमान असल्याचे सोनवणे म्हणाले.
