Bala Nandgaonkar On Shivsena UBT and Yuti : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर अखेर २४ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या युतीची अधिकृत घोषणा केली.
ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा झाली असली तरी अद्याप ठाकरे गट आणि मनसेतील जागावाटपाचा फॉर्म्युला नेमका कसा असेल? हे जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे जागावाटपावरून ठाकरे गट आणि मनसेत मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, यावर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. ‘काही जागांमध्ये आदलाबदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे. यावर अंतिम निर्णय झाल्यानंतर आम्ही जागा वाटपाची घोषणा करू’, असं नांदगावकरांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
बाळा नांदगावकर काय म्हणाले?
“मातोश्रीवर आम्ही आलो होतो. काही जागांमध्ये आदलाबदल करण्याचा विषय होता. त्यासाठी आम्ही मातोश्रीवर आलो होतो. त्यावर आता चर्चा झाली आहे. आज रात्री आम्ही पुन्हा चर्चा करणार आहोत. त्यानंतर आम्ही अंतिम निर्णयावर येऊ. त्यानंतर आमची जागा वाटपाची घोषणा होणार आहे. आज आम्ही एवढ्यासाठीच मातोश्रीवर आलो होतो, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि मी असे आम्ही तिघे चर्चा करण्यासाठी आलो होतो. आता आम्ही पुन्हा राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत”, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
शिवडी, विक्रोळी, माहिम, भांडूप या ठिकाणी ज्या जागा मिळत आहेत त्यावर पक्ष समाधानी नसल्याची चर्चा आहे, असा प्रश्न पत्रकारांनी बाळा नांदगावकर यांना विचारला. यावर बोलताना नांदगावकर म्हणाले की, “युतीच्या चर्चांमध्ये काही जागा द्याव्या लागतात आणि काही जागा घ्याव्या लागतात. देवाण-घेवाण होत असते. आम्ही आमच्या अनुभवाने युतीची वाटाघाटी करत आहोत. त्या प्रमाणे जेवढ्या जागा आमच्या पदरात पाडून घेता येतील तेवढा प्रयत्न आम्ही करत आहोत”, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं.
युतीची घोषणा झाली तेव्हा राज ठाकरे काय म्हणाले होते?
“मला बाकी जे बोलायचंय ते जाहीर सभांमधून बोलेन. मात्र, मी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली. कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात. जे निवडणुका लढवणार आहेत, त्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे वगैरे माहिती नंतर दिली जाईल. बरेच दिवस ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता, ती शिवसेना (ठाकरे) व मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत”, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली होती.
‘मुंबईचा महापौर मराठीच होणार : राज ठाकरे
“मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच (ठाकरे गट आणि मनसेच्या युतीचा) होणार”, असंही राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं.
