scorecardresearch

सोलापूर : ..तर जड वाहने फोडण्याचा बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा

अन्य काही संघटनांनी या प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर खापर फोडत थेट नगरमध्ये जाऊन विखे-पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

सोलापूर : ..तर जड वाहने फोडण्याचा बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा
..तर जड वाहने फोडण्याचा बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुखांचा इशारा (प्रातिनिधिक छायाचित्र)

सोलापूर शहरात जड वाहतूक दिवसा बंद असूनही कायदेशीर नियमांचे उल्लंघन करीत जड वाहतूक राजरोसपणे सुरूच आहे. या जड वाहतुकीमुळे निष्पाप जिवांचे बळी जात असूनही त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत आहे. त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत, येत्या दोन दिवसांत संबंधित बेजबाबदार वाहतूक शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व इतर संबंधितांवर कठोर कारकाई व्हावी आणि जड वाहतूक दिवसा बंद व्हावी, अन्यथा शहरात दिवसा येणारी कोणतीही जड वाहने फोडण्यात येतील, असा सज्जड इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमूख मनीष काळजे यांनी दिला आहे. तर, अन्य काही संघटनांनी या प्रश्नावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर खापर फोडत थेट नगरमध्ये जाऊन विखे-पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी लावून आंदोलन करीत, जाड वाहतुकीच्या प्रश्नावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसह सर्वांचे लक्ष वेधले. दिवसा बंद असताना राजारोसपणे जड वाहतूक होत असताना वाहतूक नियंत्रण पोलीस आणि आरटीओ यंत्रणेचे त्याकडे दुर्लक्ष कसे होते, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम व जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी आंदोलनस्थळी बोलताना केला.

हेही वाचा – ‘पंडित नेहरूंवर युरोप, इंग्रजांचा प्रभाव’; गोपीचंद पडळकरांचे विधान; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत म्हणाले…

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी दोन दिवसांत शहरातील जड वाहतूक सक्तीने दिवसा बंद न ठेवल्यास आणि आतापर्यंत या जड वाहतुकीने घेतलेल्या बळींना जबाबदार असलेल्या संबंधित वाहतूक शाखा व अन्य अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई न झाल्यास शहरात दिवसा येणारी सर्व जड वाहने फोडून टाकण्यात येतील. बाळासाहेबांची शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, यात होणाऱ्या परिणामास संपूर्ण यंत्रणाच जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा – बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊतांच्या मालमत्तेची होणार चौकशी, मुंबई उच्च न्यायालयाचा एसीबीला आदेश

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते राज सलगर, सुहास कदम, राम जाधव, शेखर बंगाळे, प्रशांत बाबर, सोमनाथ राऊत, अक्षय अंजिखाने, निशांत साबळे आदींनी एकत्र येऊन जड वाहतूक विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय असल्यामुळेच दिवसा बंदी असूनही जड वाहतूक राजरोसपणे सुरू राहते आणि त्यातूनच अनेक निष्पापांचे हकनाक बळी जातात. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दुर्लक्षच केले आहे. पालकमंत्री विखे-पाटील यांना तर सोलापुरात यायला सवड मिळत नाही. त्यामुळे, आता विखे-पाटील यांच्या नगरमध्ये जाऊन त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. येत्या पाच दिवसांत परिस्थिती सुधारणार नसेल तर आम्हाला नगरमध्ये पालकमंत्री विखे-पाटील यांच्या घरासमोर आंदोलन करावे लागेल, असा इशारा राज सलगर व इतरांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:01 IST