Balasaheb Thackeray’s birth centenary: बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त महाराष्ट्रासह देशभरातील नेतेमंडळींकडून अभिवादन केलं जात आहे. एकीकडे आदित्य ठाकरेंनी आपल्या आजोबांसाठी एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर केली असताना आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला प्रेरणा मिळते, असं मोदींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणाऱ्या बाळासाहेबांचे जनतेशी एक अद्वितीय नाते होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू”.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरेंसोबत चर्चा करताना दिसत आहे. त्यातील एक फोटो एका राजकीय सभेतील आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी काढलेले फोटो पंतप्रधानांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

शिवसेनेचा पहिला मेळावा

बाळासाहेब ठाकरेंनी १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार आहे. महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.’ त्यांनी अखेरपर्यंत मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढा दिला. शिवसेनेचा पहिला मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग असल्याचं सांगितलं जातं.

बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त आदित्य ठाकरेंनी आजोबांना अभिवादन करत आदरांजली वाहिली. आदित्य यांनी सोशल मिडिया पोस्ट करत लिहले की,
“आजा,
तुझा आशीर्वाद
हिच माझी ताकद,
हिच माझी ऊर्जा!”