scorecardresearch

“माझा बाप तर चोरलाच, पण मी काढलेले फोटोही चोरत आहेत”, नागपुरातील ‘त्या’ बॅनरवरून उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

उद्धव ठाकरे यांनी बॅनरवरील फोटोवरून शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

“माझा बाप तर चोरलाच, पण मी काढलेले फोटोही चोरत आहेत”, नागपुरातील ‘त्या’ बॅनरवरून उद्धव ठाकरेंची टोलेबाजी
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

१९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि महापुरुषांचा होणारा अवमान, यावरून हे अधिवेशन चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्षाने विविध मुद्दे उपस्थित करून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळात खडाजंगी सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली आहे.

शिंदे गट मागील काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंना चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते मी काढलेले फोटोही चोरत आहेत. त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टोलेबाजी केली आहे. नागपुरात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा- “सावरकरांना ‘भारतरत्न’ नाही दिला तरी चालेल, पण…”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानानंतर विधान परिषदेत गदारोळ, नेमकं काय घडलं?

शिवसैनिकांना संबोधित करताना शिंदे गटाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांची स्वत: काही कमवण्याची लायकी नसते, ते सगळं काही चोरतात. ते शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले, आता ते पलीकडे गेले आहेत. जाताना त्यांनी माझे वडील, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चोरण्याचा प्रयत्न केला. पण ते माझी हिंमत चोरू शकत नाही. हिंमत अंगात असावी लागते. त्यांनी काय केलंय? हे त्यांना आता कळणार नाही. पण ते जेव्हा सामन्याला समोर येतील, तेव्हा मी त्यांना दाखवून देईन…”

हेही वाचा- “गोगावलेंनी शिवलेल्या सुटाला उंदीर लागतील, घरातली माणसं…”, अजित पवारांची अधिवेशनात जोरदार टोलेबाजी

“मी काल नागपुरात येताना रस्त्यावर काही पोस्टर लावल्याचे पाहत होतो. दोन्ही पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो होता. त्यामुळे आपले कोणते आणि तोतये कोणते? हेच कळत नव्हतं. त्यांच्याकडून बाळासाहेबांना चोरायचा प्रयत्न सुरू आहेच. पण ते आता मी काढलेले फोटोही चोरत आहेत. म्हणजे त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही आणि निघाले मोठे राज्य करायला… असे बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीत. त्यांना आपण टाचणी लावूच. पण भाजपा त्यांना टाचणी लावणार नाही ना? हा प्रश्न आहे. कारण ज्याप्रकारे त्यांची (शिंदे गट) भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. बरोबर त्याच मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर कशी येत आहेत? हा विचार त्यांनी करायला पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 20:47 IST

संबंधित बातम्या