मुंबई – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हिंगोलीत प्रस्तावित करण्यात आलेले हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्य सरकारकडून निधीच देण्यात अलेला नाही. यामुळे मागील चार वर्षांपासून रखडले असून यावरून शिवसेना ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांचे आमदार आक्रमक झाले. शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने राजकारणासाठी पक्ष फोडता आणि त्यांच्याच नावाने प्रस्तावित असणारा प्रकल्प रखडवता, असा टाेला शिवसेना आमदार ॲड. अनिल परब यांनी लगावला.

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कन्हेरगावात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्याची योजना दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आली. या प्रकलपातील प्रयोगशाळा, हळद प्रकिया उद्योग, रेडिएशन केंद्र, विद्युत उपकेंद्र उभारणी व विकेंद्रीकरण यासाठी महत्त्वाची कामे करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ मध्ये ७०९.२७ कोटी रूपयांच्या अतिरिक्त निधीला मंजुरी देण्यात आली. मात्र त्यानंतरही या प्रकलपासाठी अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला. दोन वर्षांत होणारा प्रकल्प चार वर्षांतही झालेला नाही. या प्रकल्पाच्या अध्यक्षाला मंत्रिपदाचा दर्जाही अद्याप मिळालेला नाही. यावर फलोत्पादनमंत्री भरत गोगावले यांनी या प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद आगामी अर्थसंकलपात करण्यात येईल, मंजूर ७५ पदांना मंजुरी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल आणि प्रकलपाच्या अध्यक्षांना निर्धारित सुविधा देण्यात येतील असे आश्वासन दिले.

मंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा इशारा

मंत्रिमंडळ बठकीत ८०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्यानंतरही निधी देण्यात आलेला नाही. पुरवणी मागण्यांमध्येही या प्रकलपाच्या निधीबाबत तरतूद नाही. त्यामुळे आश्वासन न देऊनही शब्द न पाळल्याने संबंधित मंत्र्यांविरोधात हक्कभंग आणावा का, असा इशारा अनिल परब यांनी दिला. यावेळी हिंगोलीप्रमाणे कोकणात राजापूरमध्येही या संशोधन केंद्राचे उपक्रेंद करण्यात यावे अशीही मागणी करण्यात आली. आनंदाचा शिधामधून वर्षातून एकदा दोन किलो हळद द्यावी, प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना हळदयुक्त दुधाचा पुरवठा करावा, अशी मागणीही यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली.