राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप दोन आठवड्यांहून अधिक काळ चालू आहे. राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी चालू असणारा हा संप दिवसेंदिवस चिघळताना दिसून येत आहे. भाजपा हा संप अधिक पेटवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप वारंवार सत्ताधारी पक्षाकडून होत आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही भाजपावर अशीच टीका करत त्यांना सुनावलं आहे.

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही. एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेली आहे. अजूनही परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे.

हेही वाचा – केंद्राकडून झालं आता महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त कधी होणार?; बाळासाहेब थोरात म्हणतात,…

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच भाजपावर टीकाही केली आहे. ते म्हणाले, “आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. पण विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या सांगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नये. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं तर हे कोणीही नेते येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका”.