नारायण राणेंच्या विधानाबाबत बाळासाहेब थोरात यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

केंद्रीय मंत्री राव साहेब दानवेंच्या वक्तव्यासंदर्भातही केली आहे टिप्पणी; भाजपावर साधला आहे निशाणा

(प्रातिनिधक छायाचित्र)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रे दरम्यान महाड येथील पत्रकारपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेल्या गंभीर वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे. शिवाय, राज्यातील राजकीय वातावरण देखील कमालीचं तापलं आहे. शिवसेनेने राणेंच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत, राज्यभर आंदोलनं सुरू केली. तर भाजपा कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरल्याने मोठा वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नारायण राणेंच्या विधानावर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, राज्यात महाविकासआघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीकडूनही या वक्तव्याचा निषेध नोंदवला गेला. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना नारायण राणेंचं खळबळजनक विधान!

बाळासाहेब थोरात माध्यमांशी बोलाताना म्हणाले, “कालची जी घटना आहे, ती आपण पाहिलं तर तशी दुर्दैवी वाटते. महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिली गोष्ट आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात हे आहे की एक संस्कृती आहे, एकामेकांचा सन्मान करण्याची विरोधी पक्षात असलात तरी. टीका हा एक अपरिहार्य भाग असतो, टीका करावी लागते, बोलावं लागतं. परंतु त्याचा स्तर कोणता असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने, नारायण राणे जे मंत्री आहेत त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, त्याला टीका देखील म्हणता येत नाही. तिला टीका म्हणणं देखील योग्य नाही. त्यातून त्यांनी जो शब्द वापरला, तो अत्यंत दुर्दैवी आहे आणि महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व हे मुख्यमंत्री करत असतात, तो मानबिंदू असतो, अस्मिता असते, कुणीही मुख्यमंत्री असो. त्यांच्याबाबतीत असा शब्द वापरणं तर अतिशय चुकीचं होतं. म्हणून माझ्या मते जे काही घडलंय याबाबत आम्ही निषेध करतो आहोत, त्या वाक्याचा, नारायण राणे यांचा. त्यामुळे त्यांना अखेर कारवाईला सामोरं जावं लागलं.”

नैराश्यामधून भाजपा मंत्र्यांकडून अशी भाषा वापरली जात आहे –

तसेच, “ही द्वेष पूर्ण कारवाई म्हणता येत नाही, ती कायद्याची कारवाई आहे. द्वेषाचं राजकारण असू नये भाजपा जर याचं समर्थन करत असेल, तर भाजपाच्या मंत्र्यांची जी भाषणं विविध ठिकाणी सुरू आहेत, ते पाहता कुठतरी त्यांच्या मनात नैराश्य आलेलं आहे, परिणामी ते नैराश्यातून अशाप्रकारची भाषा करत आहेत. असं दिसून येत आहेत. केंद्रीय मंत्री रावासाहेब दानवे यांनी देखील ज्या प्रकारे भाषण केलेलं आहे, ते देखील महाराष्ट्राच्या संस्कृतीचं नाही.” असं देखील बाळासाहेब थोरात यांनी यावेळी बोलून दाखवलं.

कारवाईचा कोणताही संबंध लावायचं कारण नाही, चुकीचं बोललं तर कारवाई होणारचं –

याचबरोबर, “या कारवाईचा कोणताही संबंध लावण्याचं कारण नाही. चुकीचं कोणी बोललं, वागलं तर कारवाई होणारचं. हे जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा आम्हाला एकप्रकारे ठीकही वाटलं होतं, की राज्याचे चार प्रश्न सोडवण्यासाठी यांची मदत होईल. महाराष्ट्राच्या जनेतेच प्रश्न सोडवता येईल, आपले अनेक गाऱ्हाणे केंद्राकडे आहेत की जे सुटणे आवश्यक आहे. त्यामध्ये त्यांची मदत होईल, हे त्यांनी केलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मात्र ते सोडून दिलं…आणि जन आशीर्वाद यात्रा.. आशीर्वाद मागायचा अधिकार सगळ्यांना आहे, त्या निमित्त ते जे वक्तव्य करत आहेत, ती मात्र दुर्दैवी आहेत. त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न कसे सोडवता येतील, त्यानी ते पाहावं. केंद्राकडून सोडवून घ्यावेत आणि खुशाल आशीर्वाद घ्यावेत. ” असं बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितलं.

नारायण राणेंच्या वक्तव्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राणेंच्या वक्तव्यावर काल टिप्पणी केली होती, ”आम्ही तर आज दिवसभर नांदेडला कार्यक्रमात होतो. तिथं आम्हाला ही घटना कळाली. आता मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्री बैठकीस होते, दोघांनाही आम्ही भेटलो. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे देखील होते. महाराष्ट्रात भाजपाच्या माध्यामतून नवीन घटना घडत आहेत, ज्या कधी राज्यात घडल्याच नाहीत. ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतही नाही. मुख्यमंत्र्यांबद्दलचं या पद्धतीचं वक्तव्य केंद्रीयमंत्र्यांनी करावं, ही निषेधार्य बाब आहे. काँग्रेसच्यावतीने त्याचा निषेध देखील आम्ही सकाळी ही घटना माहिती झाल्यावर केलेला आहे.” असं ते म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Balasaheb thorat reacted to narayan ranes statement said msr

ताज्या बातम्या