एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव मिळालेलं आहे. तर विरोधकांकडून नेमके कोणते बाळासाहेब असा प्रश्न करून डिवचलं गेलं आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील शिंदे गटाला यावरून टोला लगावला आहे.

माझं नाव वापरलं तर रॉयल्टी द्यावी लागेल, असं मिश्किलपणे बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. “बाळासाहेब थोरांतांची म्हटलं तर मला त्यांच्याकडून फोटो लावला तर रॉयल्टी घ्यावी लागेल.” असं थोराता यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

याशिवाय, “सध्या काय सुरू आहे याचं नागरिकांनी आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. लोकशाही, देश कशाप्रकारे पुढे जातोय. खरंतर आत्मपरीक्षण करून निर्णय घेण्याचीही वेळ आहे.” असंही थोरात म्हणाले.

सोनिया गांधींकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा –

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की “महाविकास आघाडी म्हणून सोनिया गांधी यांनीच निर्णय दिला आहे की आपण मदत करायची, पाठिंबा द्यायचा. त्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. आम्ही एकत्र पद्धतीने सामोरे जाणार आहोत. मला खात्री आहे, एकंदर भाजपा आणि त्यांचं सगळं राजकारण आणि आता ज्या पद्धतीने महाराष्ट्र त्यांनी ताब्यात घेतलेला आहे, हे पाहता जनता त्यांच्यावर नाराज आहे हे निश्चित आहे. त्याचा परिणाम आपल्याला या निवडणुकीत दिसेल.”